दिल्लीतील साहित्य संमेलनात राजकीय व्यक्तींचा वापर यावर टीका झाली, त्यावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. दुर्गा भागवत यांच्यापासून तारा भवाळकर यांच्यापर्यंतचा प्रवास यानिमित्तानं चर्चिला गेला. महाराष्ट्र सरकारनं साहित्य संमेलन ताब्यात घेतल्याच्या चर्चेला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तृत्वानं मागं टाकलं. भवाळकर यांनी महिला म्हणून पदं मिळत नसतात, तर ती गुणवत्तेवर मिळत असतात, असं सांगितलं असताना डॉ. गोऱ्हे यांनी गुणवत्तेपेक्षा मसिर्डीज महत्त्वाचं असल्याचं सांगताना चिखल उडवून घेतला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे जणू समीकरणच झालं आहे. पूर्वी अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद व्हायचे आणि वादाला कोणतंही कारण पुरतं. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्ती हव्यात की नकोत इथंपासून साहित्य संमेलनाला सरकारी पैसा चालतो आणि मग राजकीय नेते का नकोत इथपर्यंत चर्चा होत असते. दिल्लीचं संमेलनही या चर्चेला अपवाद नव्हतं. साहित्य संमेलनाच्या इतिहासात दोनदा उद्घाटनं करणं, व्यासपीठावर साहित्यिकापेक्षाही राजकीय नेत्यांची संख्या जास्त असणं, उशीर झाल्यानं संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांना भाषण उरकतं घेण्याचा सल्ला देणं, काव्य संमेलन पुढं ढकलणं, साहित्य संमेलनाच्या निमित्तानं लावण्यात आलेल्या फलकांवर राजकीय नेत्यांच्या तुलनेत साहित्यिकांना गौण स्थान देणं हे वादाचे अनेक कंगोरे असताना त्यावर कडी केली, ती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या राजकीय वक्तव्यानं. ताळतंत्र सोडून काही बोललं, की त्याचा कसा अंगार होतो, हे डॉ. गोऱ्हे यांच्या दिल्लीतील वक्त्यातून दिसलं. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती ही पदं अराजकीय असतात. त्या पदावर निवडून जाईपर्यंत त्या व्यक्ती राजकीय पक्षांच्या असतात. निवड झाली, की त्या घटनात्मक होतात. या पदांवरील व्यक्तींनी राजकीय भाष्य, टीकाटिप्पणी करायची नसते. या चार व्यक्ती ‘स्पीकर’ असल्या, तरी त्यांनी बोलायचं नसतं, याचं भान अलीकडच्या काळात या पदावर गेलेल्या व्यक्तींना राहिलं नाही. जगदीप धनखड यांच्यासारख्या अनेकांच्या पंक्तीत आता डॉ. गोऱ्हे जाऊन बसल्या आहेत. साहित्य संमेलन साहित्यातील परिसंवाद आणि वादविवादानं गाजण्याऐवजी डॉ. गोऱ्हे यांच्या वक्तृत्वानं अधिक गाजलं. साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वीच ते गाजायला सुरुवात होते, ती परंपरा या वेळी ही पाळली गेली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता बिनविरोध होत असल्यानं संमेलन अध्यक्षाच्या निवडीवरून होणारे वाद टळले असले, तरी साहित्य संमेलनात कोणाला बोलवायचं आणि कोणते विषय साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमात ठेवायचे याचं भान अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळाला राहिलं, की नाही असा संभ्रम निर्माण होत आहे. खरं तर ‘आम्ही बी घडलो’ हा परिसंवाद साहित्याच्या व्यासपीठावर ठेवावा का, याबाबत चर्चा निश्चित होऊ शकते. राजकारण्यांना साहित्याची आवड असू शकते आणि काही राजकारणी साहित्यिक ही असू शकतात; परंतु हा विषय वेगळ्या व्यासपीठावर ठेवता आला असता; मात्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असा विषय ठेवून साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. उषा तांबे यांनी काय साध्य केलं, असा प्रश्न निर्माण होतो. डॉ. गोऱ्हे यांनी मुलाखतीत जी मुक्ताफळं उधळली, त्यामुळं डॉ. तांबे यांच्यावरही यांच्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांच्यावरही त्यामुळं टीका झाली. या दोघांनी माफी मागावी इथपर्यंत खासदार संजय राऊत यांची मजल गेली. वास्तविक स्वागताध्यक्ष आणि संमेलनाध्यक्षांचा परिसंवादातील विषयाशी फारसा संबंध असतो. किंबहुना मराठी साहित्य महामंडळ हे स्वायत्त असून त्यांनी जे कार्यक्रम ठेवले, त्यात स्वागताध्यक्षांनी हस्तेक्षप करण्याचा संबंधच येत नाही, तरीही या परिसंवादात डॉ. गोऱ्हे, पृथ्वीराज चव्हाण आणि सुरेश प्रभू अशा तिघांचा समावेश करण्यात आला होता.
या परिसंवादात चव्हाण आणि प्रभू यांनी पथ्यं पाळली. नेत्यांची एक दुखरी बाजू असते. त्यावरची खपली काढली, की त्यातून वेदनाच वाट्याला येतात आणि त्याची बातमी होते; परंतु प्रभू आणि चव्हाण यांनी मात्र वेदनाचं भांडवल केलं नाही. हे पथ्य डॉ. गोऱ्हे यांना पाळता आलं नाही. विधान परिषदेच्या सदस्यत्त्वाची मुदत पुढच्या वर्षी संपत असताना पुन्हा एकदा सदस्यत्व मिळण्यासाठी आणि उपसभापतिपदापेक्षा अधिक चांगलं पद मिळवण्यासाठी लांगुलचालन करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट पदासाठी मसिर्डीज घेतल्याचा आरोप केला. डॉ. गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानं त्यांनी आयुष्यभर जे कमावलं, ते क्षणात धुळीला मिळवलं. या मुलाखतीत मुलाखतकारांनी कोणताही आडवा हिरवा प्रश्न विचारला, तरी कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर टाळायचं किंवा त्याला बगल द्यायची हे परिसंवादात सहभागी झालेल्याला ठरवता आलं पाहिजे. आपल्या तोंडून जर एखादा शब्द गेला, तर तो शब्द कात्रीसारखा इतरांवर वार करू शकतो आणि त्याचे परिणाम आपल्या अंगावरही रक्ताच्या चिळकांड्या उडू शकतात, हे वक्त्यानं लक्षात घ्यायला पाहिजे होतं. अनेकदा शब्द कसे वापरावेत याच्याबाबत अनेक संतांनी सांगून ठेवलं आहे. ‘शब्द घासावा! शब्द तासावा! शब्द तोलावा! बोलण्यापूर्वी! शब्द हेचि कातर! शब्द सुई दोरा! बेतावे शब्द शास्त्राधारे! असं संत मोजक्या शब्दांतून शब्दांचं महत्त्व अधोरेखित करतात. आपले शब्द हे कात्री होऊन कापण्याचं म्हणजे तोडण्याचं काम करतात, की की सुई दोरा होऊन जोडण्याचं काम करतात, हे अगोदर मनोमन ठरवता यायला हवं. नाव आणि इज्जत कमवायला आयुष्य लागतं आणि आपल्या जिभेवर ताबा नसेल, तर क्षणात आपलं नाव धुळीला मिळतं. याचा अनुभव आता डॉ. गोऱ्हे यांना आला असेल. मुळात डॉ. गोऱ्हे या महिला चळवळीतून पुढं आलेल्या नेत्या. महिला विषयक अनेक संघर्षात त्या स्वतः सहभागी झालेल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोठेवाडी दरोडा प्रकरणासह राज्यभरातील अनेक दरोडा प्रकरणात महिलांवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा त्यांनी लावून धरला. आरोपींना शिक्षा देईपर्यंत त्या लढल्या. महिलांवरील अत्याचारासंदर्भात त्यांनी अनेक ठिकाणी मोर्चे काढले. महिलांना न्याय मिळवून दिला. डॉ. गोऱ्हे यांचं माहेर आणि सासर दोन्ही साहित्यिक पार्श्वभूमी असलेले. डॉ. गोऱ्हे यांचा साहित्यात चांगला वावर. त्या स्वतः कविता करण्यात रस घेणाऱ्या आणि अनेक नियतकालिकातून त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहिलेले. साहित्याची त्यांना मोठी आवड. असं असताना केवळ आपण कोणत्या व्यासपीठावरून बोलतो आहोत आणि काय बोलतो आहोत, याचं औचित्य न पाळल्यानं त्यांच्यावर ही मोठी नामुष्की ओढवली.
साहित्य संमेलनाचं व्यासपीठ हे राजकीय व्यासपीठ नाही, याचं भान त्यांनी ठेवलं नाही. मुळात साहित्य संमेलन हे आरोप-प्रत्यारोपासाठी नसतंच. आपल्या आरोपामुळं काय गदारोळ होऊ शकतो आणि विरोधकांच्या हाती आपण कसं कोलित देऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. गोऱ्हे यांचं वक्तव्य. विधान परिषदेवर चार वेळा संधी मिळालेल्या आणि प्रदीर्घकाळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या अतिशय निकटच्या राहिलेल्या डॉ. गोऱ्हे यांनी याच कुटुंबावर थेट आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करावेत, यासारखा दुसरा प्रमाद नाही. विधान परिषदेच्या सदस्य आणि विधान परिषदेच्या उपसभापतीची संधीही ज्या शिवसेनेमुळं आपल्याला मिळाली, त्या शिवसेनेत दोन गट पडले. त्यापैकी कुठल्या गटात सहभागी व्हायचं याचा अधिकार जरी डॉ. गोऱ्हे यांना असला, तरी त्यांनी आता केलेला आरोप हा कितपत तर्कसंगत आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे. शिवसेनेत मर्सिडीज कार देऊन पदं मिळत असतील, तर मग आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांनी किती लोकांना पदं दिली आणि जितक्या लोकांना पदं दिली, त्यांनी दिलेल्या मर्सिडीज कुठं आहेत हा पुन्हा एक गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. राजकीय पक्ष उमेदवारी देताना काय करतात हे आता सर्वज्ञात आहे, ते वेगळं सांगण्याची आवश्यकताही नाही. एक वेळ उमेदवारी देताना पैसे घेतले जातात, असा आरोप केला असता, तर ते समजू शकलं असतं; परंतु एक पद देताना दोन मर्सिडीज कारची आवश्यकता काय, असा प्रश्न कोणी विचारला, तर त्यावर उत्तर मिळू शकणार नाही. मुळात साहित्य संमेलनातील ‘आम्ही कसे घडलो’, यावर बोलताना आपली चांगली जडणघडण कशी झाली, हे सांगायला हवं होतं. त्याऐवजी आपले नेतेच कसे भ्रष्ट आहेत, हे सांगण्यात धन्यता मानण्यात आली. एरवी एखाद्या जाहीर सभेत अशा स्वरूपाचा आरोप खपूनही गेला असता. कारण ते व्यासपीठ वेगळं असतं. साहित्य संमेलन हे अराजकीय असतं. या व्यासपीठाचा उपयोग करून सार्वजनिक धुणी धुवायची नसतात, एवढं भान प्रदीर्घकाळ राजकारणात गेलेल्या डॉ. गोऱ्हे यांना असू नये, याबद्दल आश्चर्य वाटतंय. मुळात नको असलेल्या गोष्टी नको त्या ठिकाणी उच्चारल्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत पानिपत झालेल्या आणि दिशाहीन झालेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाला या निमित्तानं डॉ. गोऱ्हे यांच्या वक्तृत्वानंच संघटित व्हायला आणि रस्त्यावर यायला संधी दिली, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. डॉ. गोऱ्हे या ठाकरे यांच्यावर आरोप करायला गेल्या आणि आता त्यांच्यावरच मोठमोठे आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. उमेदवारी देण्यासाठी डॉ. गोऱ्हे कसे पैसे घेत होत्या आणि उमेदवारीसाठी पैसे घेऊनही त्यांनी इतरांनाच कशी उमेदवारी मिळवून दिली. इथपासून ते कोणाकडून त्या साड्या घेतात, इथपर्यंतचे आरोप आता व्हायला लागले आहेत. विधान परिषदेसारख्या राज्याच्या वरिष्ठ सभागृहात लक्षवेधी सूचना मांडायला कसा बाजार भरवला जातो, हे आता सांगितलं जायला लागलं आहे. त्यामुळं लोकांचा विधिमंडळातील होणाऱ्या चर्चेवरचा विश्वास उडू शकतो आणि संसदेत जसे काही प्रश्न मांडायला कुणाकडून तरी भेटवस्तू घेतल्या जातात, पैसे घेतले जातात तसंच ते महाराष्ट्राच्या विधिमंडळातही घडतं, असं आता डॉ. गोऱ्हे यांच्या प्रकरणातून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपातून पुढं आलं. आता डॉ. गोऱ्हे काही पुरावे देणार असल्या, तरी त्याला काही अर्थ नाही. चांगल्या व्यासपीठाचा चुकीचा उपयोग केल्याचा प्रमाद त्यांच्या हातून घडलाच. अर्थात खा. संजय राऊत यांनी या प्रकरणात वापरलेली भाषाही समर्थनीय नाही. या प्रकरणात आता शिवसेनेच्या दोन्ही गटात जे आरोप-प्रत्यारोप आणि वस्त्रहरण सुरू आहे, त्यावरून आपण किती खालच्या पातळीवर गेलो आहोत, हे दिसतं. एकमेकांचं वस्त्रहरण करताना शिवसेनेचे दोन्ही गट निर्वस्त्र होत आहेत, याचं भान मात्र कुणालाही राहिलेलं नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी, बागा वरखाडे