बीड : कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बीड जिल्ह्यात १४४ कलमान्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याचे सांगत जोपर्यंत जमावबंदी आदेश लागू आहे. तोपर्यंत ना समर्थनार्थ ना विरोधात कुठल्याही मोर्चाला परवानगी देणार नाही, असे म्हणत जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी शनिवारी दगडफेक केलेल्या तथाकथीत नतद्रष्टांच्या मुसक्या बांधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक करणार असल्याचे म्हटले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी शनिवारच्या दगडफेकीच्या घटनेवर पत्रकार परिषद घेतली. सुरुवातीलाच हर्ष पोद्दार यांनी अफवा पसरवणार्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दगडफेक झाली नसल्याचे सांगितले.
याबाबत कोणी अफवा पसरवत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असे म्हणत त्याच्यावर तात्काळ ५५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगत शनिवारच्या घटनेत काही संघटनांचा समावेश आहे का याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे या वेळी त्यांनी म्हटले. तसेच दगडफेक प्रकरणी ३० जणांना ताब्यात घेतले असून सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर जवळपास १०० जण यामध्ये सापडू शकतात. दगडफेकीमध्ये १८ ते २३ वर्षांच्या वरील युवकांचा समावेश असल्याचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.
याच घटने दरम्यान अंबाजोगाईमध्ये देखील दगडफेक झाली होती. त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांची उपस्थिती होती.