MLA Mahesh Landge in Trouble: भोसरी विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित मतदार यादी घोटाळ्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी अजित गव्हाणे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने लांडगे यांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने लांडगे यांना १५ एप्रिलपर्यंत याचिकेतील आरोपांबाबत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी लांडगे यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात ६२ हजारांहून अधिक बोगस मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट असल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला आहे. तसेच, एकाच नावाच्या, वय, घराचा पत्ता सारखाच असलेल्या व्यक्तींना वेगवेगळे मतदान ओळखपत्र देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या प्रकरणी ॲड.असीम सरोदे यांनी सांगितले की, “निवडणूक प्रक्रियेत मतदारयादी आणि ईव्हीएमचा गैरवापर झाला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने वेळीच दखल घेणे आवश्यक होते, पण त्यांनी दुर्लक्ष केले.”
उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे भोसरी विधानसभा निवडणुकीतील निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता लांडगे या आरोपांना काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे