टॅरिफच्या वादळात कोसळला शेअर बाजार;’ब्लॅक मंडे’ने गुंतवणूकदारांना मोठा झटका

410
Visual depiction of 'Black Monday' stock market crash in India triggered by Trump's tariff announcement, showing Trump with a tariff board, falling currency notes, a stormy background, and investors outside the Bombay Stock Exchange.
टॅरिफच्या वादळात कोसळला शेअर बाजार

Black Monday stock market crash India 2025 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आणि आज बाजार उघडताच ऐतिहासिक घसरण नोंदवण्यात आली. गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस ‘ब्लॅक मंडे’ ठरला आहे.

आज सकाळच्या सत्रात निफ्टी तब्बल १,१०० अंकांनी कोसळला आणि २१,८०० च्या पातळीवर पोहोचला. तर, सेन्सेक्समध्ये ३,३०० अंकांची मोठी घसरण झाली आणि तो ७१,९०० च्या आसपास व्यवहार करत होता. बँकिंग क्षेत्रालाही मोठा फटका बसला असून बँक निफ्टी २००० अंकांनी खाली आला. याशिवाय, निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांकातही मोठी घसरण झाली असून तो ३,४०० अंकांनी घसरून ४७,२४९ वर पोहोचला.

जागतिक घडामोडींमुळे बाजारात भीती आणि अस्थिरतेचं वातावरण;

या मोठ्या घसरणीमुळे इंडिया व्हीआयएक्समध्ये ५६ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे, जी बाजारातील भीती आणि अस्थिरता दर्शवते. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेच्या बाजारात सलग तीन दिवस मोठी घसरण झाली. या घसरणीचा फटका आशियाई बाजारांनाही बसला. गिफ्ट निफ्टी ९०० अंकांनी घसरून २२,१०० अंकांवर बंद झाला, तर जपानचा निक्केई निर्देशांकात तब्बल ६ टक्क्यांची, म्हणजेच २,३०० अंकांची मोठी घसरण झाली.

अमेरिकेच्या बाजारात शुक्रवारी मोठी विक्री झाली होती आणि बाजार गेल्या ५ वर्षांतील नीचांकी पातळीवर बंद झाला. डाऊ जोन्समध्ये २,२५० अंकांची, तर नॅसडॅकमध्ये जवळपास १,००० अंकांची घसरण झाली होती. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) देखील भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढले आहेत. एफआयआयने सलग पाचव्या दिवशी विक्री केली असून शुक्रवारी त्यांनी कॅश, निर्देशांक आणि शेअर फ्युचर्समध्ये मिळून सुमारे ९,५२५ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. यासोबतच, देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही १,७२० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

बाजारातील या मोठ्या घसरणीमागे अनेक कारणं आहेत. आशियाई आणि जागतिक बाजारात झालेली मोठी घसरण, अमेरिकेच्या बाजारात मोठी पडझड आणि चीनने अमेरिकेवर लावलेल्या ३४ टक्के शुल्कानंतर व्यापार युद्धाचा वाढलेला धोका ही प्रमुख कारणं आहेत. सध्या क्रूड ऑईलचे दर ६३ डॉलरच्या आसपास आहेत, तर सोन्याचे भाव ३,००० डॉलर प्रति औंसच्या खाली आले आहेत. यासोबतच, बेस मेटल्स आणि क्रिप्टो मार्केटमध्येही मोठी घसरण दिसून येत आहे. अमेरिकेतील बाँड यील्ड ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, ३.९ टक्क्यांच्या खाली आलं आहे. त्यातच, व्याजदरांवरून ट्रम्प आणि पॉवेल यांच्यातील शाब्दिक युद्ध अधिक तीव्र झालं आहे.

व्यापार युद्धाच्या धोक्यामुळे अमेरिकेच्या फ्युचर्समध्ये आजही घसरण दिसून येत आहे. डाऊ फ्युचर्स १,२०० अंकांनी, तर नॅसडॅक फ्युचर्स ८०० अंकांनी खाली आलं आहे. एस अँड पी फ्युचर्समध्ये ४ टक्क्यांची घसरण झाली असून तो ५,००० च्या खाली पोहोचला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीनने १० एप्रिलपासून अमेरिकेच्या सर्व उत्पादनांवर अतिरिक्त ३४ टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयावर ट्रम्प यांनी चीन घाबरल्यामुळे असं करत असल्याचं म्हटलं आहे. या सर्व घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून बाजारात मोठी अस्थिरता दिसून येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे