CSK Win 2nd Match IPL 2025 vs LSG :चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 5 विकेट्सने पराभव करत यंदाच्या मोसमातील दुसरा विजय मिळवला आहे. सलग पाच परभवानंतर चेन्नईने आयपीएल २०२५ मध्ये विजय मिळवला आहे. लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने लखनौ सुपर जायंट्सच्या घरच्या मैदानात घुसून लखनौला पाणी पाजत यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफसाठीच्या आशा कायम ठेवल्या आहेत. रिषभ पंतच्या लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना १६६ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात, शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात सीएसके संघाने ५ विकेट्सने आपला विजय निश्चित केला. धोनीने ११ चेंडूत २६ धावांची तुफानी खेळी करून चेन्नईच्या विजयात मोठे योगदान दिले.
शेख राशीद आणि रचिन रवींद्र या सलामी जोडीने १० च्या सरासरीने धावा करत चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी अर्धशतकी भागीदारी उभारली. पण ५ षटकात राशिदला आवेश खानने निकोलस पुरनच्या हातात झेलबाद केले. राशिदने १९ चेंडूत ६ चौकार ठोकत २७ धावा केल्या. विकेट्स गेल्यानंतर रचिन चांगल्या लयात खेळत होता. मात्र, आठव्या षटकांत त्याला एडेन मार्करमने बाद केले. रचिनने २२ चेंडूत ३७ धावा केल्या. यानंतर राहुल त्रिपाठी आणि रवींद्र जाडेजा लवकर बाद झाले. त्यामुळे चेन्नईचे टेंशन वाढले होते.
पण यानंतर एमएस धोनी फलंदाजी करण्यासाठी उतरला, त्याने दमदार व आक्रमक शॉटस खेळत चेन्नईचा विजय जवळ आणला, त्याला दुसऱ्या स्थानावरून शिवम दुबेने चांगली साथ दिली. या दोघांत नाबाद अर्धशतकांची भागीदारी झाली. त्यामुळे चेन्नईला १९ व्या षटकांत विजय मिळवता आला. कर्णधार धोनीने ११ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार तर शिवम दुबेने ३७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार लगावत नाबाद ४३ धावा केल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर