पिंपरी-चिंचवडचे नागरिक आता पोलिसांचे ‘ट्राफिक बडी’; वाहतूक समस्यांवर थेट तोडगा!

32
Pimpri Chinchwad Police Take Traffic Buddy App Initiative.
वाहतूक समस्यांवर थेट तोडगा;

Pimpri Chinchwad Police Take Traffic Buddy App Initiative: पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी आणि नियमांचे उल्लंघन आता इतिहासजमा होणार! शहरातील जागरूक नागरिकच आता पोलिसांचे ‘सीसीटीव्ही’ बनणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरळीत करण्यासाठी ‘ट्राफिक बडी’ या अभिनव यंत्रणेची घोषणा केली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बुधवारी या महत्वाकांक्षी उपक्रमाची माहिती दिली, ज्यामुळे नागरिकांना वाहतुकीशी संबंधित कोणत्याही तक्रारी थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता येणार आहेत.

आता शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, खराब रस्ते, बंद सिग्नल यंत्रणा, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि चुकीच्या पद्धतीने केलेले पार्किंग यांसारख्या समस्यांसाठी केवळ एका क्लिकवर तक्रार दाखल करता येणार आहे. यासाठी पोलिसांनी (+91८७८८६४९८८५) हा व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला आहे. विशेष म्हणजे, हे ‘ट्राफिक बडी’ ॲप लोकेशन आधारित असल्याने तक्रारदाराला चुकीची माहिती देण्याची शक्यता नाही. लवकरच या यंत्रणेची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

या उपक्रमामुळे केवळ तक्रारी दाखल होणार नाहीत, तर रस्त्यांवरील खड्ड्यांसारख्या समस्यांची माहिती संबंधित शासकीय विभागांना पाठवून त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल. त्यानंतरही रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास, महिन्याच्या अखेरीस पुन्हा पाठपुरावा केला जाणार आहे. यामुळे सातत्याने वाहतूक समस्या निर्माण होणारी ठिकाणे पोलिसांच्या निदर्शनास येतील आणि त्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कायमस्वरूपी तोडगा काढता येईल, असे आयुक्तांनी सांगितले. ‘ट्रॅफिक बडी’ हा उपक्रम खऱ्या अर्थाने नागरिकांना वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलिसांचे सक्रिय भागीदार बनवणार आहे. हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे