सांगवीच्या उद्यानांची दुर्दशा! आमदार जगतापांचा अधिकाऱ्यांवर संताप; तातडीने सुधारणा करण्याचे आदेश!

11
सांगवीच्या उद्यानांची दुर्दशा! आमदार जगतापांचा अधिकाऱ्यांवर संताप; तातडीने सुधारणा करण्याचे आदेश!
सांगवीच्या उद्यानांची दुर्दशा! आमदार जगतापांचा अधिकाऱ्यांवर संताप; तातडीने सुधारणा करण्याचे आदेश!

The plight of Sangvi’s parks! MLA Jagtap is angry with the officials; पिंपळे गुरव चिंचवड विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार शंकर जगताप यांनी सांगवी परिसरातील उद्यानांची दयनीय अवस्था पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत शिवसृष्टी उद्यान (तानाजीराव शितोळे उद्यान), छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि सावतामाळी उद्यानाला अचानक भेट दिली. या पाहणीदरम्यान उद्यानांमध्ये असलेल्या असुविधा आणि गैरसोयी पाहून आमदार जगताप चांगलेच संतापले आणि त्यांनी तातडीने या समस्या दूर करण्याचे कठोर निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, प्रशांत शितोळे, उद्यान विभागाचे उपायुक्त उमेश ढाकणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि संबंधित अधिकारी या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. उद्यानांची प्रत्यक्ष पाहणी करताना आमदार जगताप यांना अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या. अनेक ठिकाणी खेळणी तुटलेली व मोडलेली आढळली, तर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे उद्यानातील झाडे आणि हिरवळ सुकून गेली होती. याव्यतिरिक्त, काही उद्यानांमध्ये मद्यपींचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार जगताप यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “शाळांना सुट्ट्या असल्याने लहान मुले मोठ्या संख्येने उद्यानात खेळायला येतात. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुमची आहे. तुटलेल्या खेळण्यांमुळे गंभीर अपघात होऊ शकतात. त्यामुळे तातडीने या खेळण्यांची दुरुस्ती करा किंवा ती हटवा,” असे स्पष्ट निर्देश आमदार जगताप यांनी दिले. तसेच, पाण्याअभावी सुकणाऱ्या झाडांवर आणि हिरवळीवर लक्ष देण्याची आणि उद्यानांचे सौंदर्य टिकवून ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.

यावेळी नागरिकांनीही आमदार जगताप यांच्यासमोर उद्यानातील समस्या आणि गैरसोयी मांडल्या. आमदार जगताप यांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि अधिकाऱ्यांना लवकरात लवकर योग्य त्या सुविधा पुरवण्याचे आदेश दिले.

उद्यान विभागाचे उपायुक्त उमेश ढाकणे यांनी सांगितले की, सांगवी परिसरातील उद्यानांमध्ये सुधारणा करण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच दुरुस्ती आणि सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यात येईल. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उद्यान विभाग सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

आमदार शंकर जगताप यांच्या या कठोर भूमिकेमुळे सांगवी परिसरातील उद्यानांची अवस्था सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता महापालिका प्रशासन या सूचनांचे किती गांभीर्याने पालन करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे