देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका ओतूर येथे
Jagadguru Sant Tukaram Maharaj:जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन असलेल्या श्री क्षेत्र ओतूर (ता.जुन्नर) येथे भव्यदिव्य त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सांगता सोहळ्यानिमित्त शनिवार दि.१७ ते दि.२५ मे या सप्ताह कालखंडात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी (दि.१७) सकाळी साडेदहा वाजता श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका हेलिकॉप्टरने ओतूर येथे आणण्यात आल्या, त्यानंतर ओतूरमध्ये नेत्रदीपक भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते,या भव्य मिरवणुकीमध्ये परिसरातील शालेय पथकांसह ३७५ धर्मध्वजधारी,३७५ टाळकरी,३७५ विणेकरी,३७५ मृदुंगाचार्य, ३७५ किर्तनकार,३७५ कलशधारक महिला,३७५ तुलसी वृंदावन धारक महिला,३७५ चोपदार,तसेच ३७५ तुकाराम नामक व्यक्ती सामील झाल्या होत्या.यांच्यासह हजारो महिला व भाविकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग होता.यामिरवणुकीत अश्व सहभाग देखील करण्यात आला होता.यावेळी संपूर्ण जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी मंदिरांवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज या गुरू-शिष्याची भेट झाली.सप्ताह कालखंडात संत तुकाराम महाराजांच्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी ओतूर येथे आठ दिवस ठेवण्यात येणार आहेत.सदर त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह निमित्त प्रतिदिन ५ हजार गाथा वाचक पारायण करणार आहेत.पाचशे टाळकरी आणि २५ मृदुंगाचार्य प्रतिदिन सेवा करणार आहेत.दररोज २४ तास पाचशे गावांचा ” राम कृष्ण हरि ” अखंड भजन प्रहरा देण्यात येणार आहे.तसेच भाविक आणि नागरिकांसाठी आठ दिवस आरोग्य शिबीर,कृषी प्रदर्शन,तसेच ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.आठ दिवस दोन सत्रात,सकाळी ११ ते १२:३०,तसेच सायंकाळी ६:३० ते ८:३० महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची किर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ऐश्वर्या शिलवंत