India and Pakistan:भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता आपल्या किचनमधील महत्त्वाच्या घटकांवर जाणवत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे दोन्ही देशांमधील व्यापारी मार्ग बंद झाल्याने सुक्या मेव्याच्या किमतींनी अचानक उसळी घेतली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने काजू, बदाम, अक्रोड आणि अंजीर यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे गृहिणींचे मासिक बजेट पुरते कोलमडले आहे.
वीस दिवसात सुक्या मेव्याच्या प्रतिकिलो ५० ते १०० रुपयांची वाढ
गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत आहे. यामुळे व्यापारी मार्ग बंद झाले असून, अफगाणिस्तानमधून येणारा सुका मेवा देशात येणे थांबले आहे. याचा थेट परिणाम बाजारातील सुक्या मेव्याच्या उपलब्धतेवर झाला आहे. मागणी भरपूर असली तरी पुरवठा कमी असल्याने व्यापारी दरवाढ करत आहेत. केवळ वीस दिवसांच्या आत सुक्या मेव्याच्या दरात प्रतिकिलो ५० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे.
रावेत परिसरातील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काजू, बदाम, अक्रोड यांच्या किमतीत जवळपास ५० रुपयांची वाढ झाली आहे, तर मनुका आणि किसमिसच्या दरातही १५ ते २० रुपयांची वाढ दिसून येत आहे. विशेष म्हणजे, काही सुक्या मेव्यांचे भाव स्थिर असले तरी, भविष्यात ते वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बिजलीनगरमधील व्यापारी रामराजे बेंबडे सांगतात, “बराच सुका मेवा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून येतो. सध्या तणाव असल्याने व्यापार थांबला आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी कमी केली आहे, ज्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होत आहे.”
भारत सरकारने पाकिस्तानसोबतचा व्यापारी मार्ग बंद केल्यामुळे आता मालाची आयात-निर्यात लांबच्या मार्गाने करावी लागणार आहे, ज्यामुळे खर्च वाढणार आहे. याचा भार थेट ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे. दरवाढीमुळे सुक्या मेव्याची खरेदी घटली असून, याचा फटका शहरातील व्यापाऱ्यांना बसत आहे. येत्या काही दिवसांत सुक्या मेव्याचे भाव आणखी किती वाढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सणासुदीच्या तोंडावर झालेली ही दरवाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे