हुंड्याची विकृती

13
Increase in married women's suicides
हुंड्याची विकृती

भागा वरखाडे,न्यूज अनकट प्रतिनिधी

विवाहित महिलांच्या आत्महत्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी स्वतःच्या भावना ओळखणे, त्यांचा स्वीकार करणे त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय गरज पडली तर पालकांनी योग्य भूमिका घेत हस्तक्षेप करून नेमकी परिस्थिती समजून घ्यावी व संवेदनशीलतेने त्यांच्या सोबत उभे राहावे. आर्थिक स्थैर्य, आत्मनिर्भरता, साहस आणि मानसिक स्थैर्यासाठी कौशल्य विकास आणि शिक्षणाची कास धरली पाहिजे. विवाहित स्त्रियांच्या आत्महत्येच्या समस्येचा सामना करण्यासाठी केवळ मानसशास्त्रीय उपायच नव्हे, तर कुटुंब, समाज आणि यंत्रणेने एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

देशात कायदा असला, तरी कायद्यापेक्षा आम्ही मोठे आहोत, कायदा आमचे काहीही करू शकणार नाही, असा समजणारा एक वर्ग आहे. त्यात मुळशीतील राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. लग्न करून घरात येणारी सून हीच लक्ष्मी आहे, असे मानण्याऐवजी तिच्या माहेरकडून वारंवार पैसे मागणे हा गुन्हा आहे. लग्नात फॉर्च्युनर, ५१ तोळे सोने, चांदीची भांडी आदी दिल्यानंतरही हगवणे कुटुंबाची भूक भागत नव्हती. एक कोटी रुपयांहून अधिक खर्च लग्नात केल्यानंतरही आणखी दोन कोटी रुपये जमीन घेण्यासाठी आणावेत, म्हणून वैष्णवीचा छळ करण्यात आला. खरेतर प्रेमविवाहात पैसा, अडका, संपत्ती यापेक्षा प्रेमाला जास्त महत्त्व असायला हवे. प्रेमासाठी वाट्टेल ते करू, अशी भाषा करणारे नवरोबा जेव्हा आईवडीलांच्या आडून पत्नीच्या माहेराहून पैशाची अपेक्षा धरतात, तेव्हा त्यांचे प्रेम किती ढोंगी असते, हे लक्षात यायला हवे. प्रेमात आकंठ बुडताना आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याचे प्रेम खरे आहे का, याचा विचार करण्याचे भान तरुणींना राहत नाही.

लग्नानंतर निर्णय चुकला असेल, तर तो दुरुस्त करता येतो, हे वैष्णवी आणि तिच्या आईवडीलांनाही कळले नाही. समाजाच्या भीतीपोटी चूक नसताना मुलीला तिथेच नांदायला ठेवून आपला पोटचा गोळा गमावल्याचे दुःख त्यांना झाले असेल; परंतु सर्वंच आईवडीलांनी मुलीचे लग्न लावून दिले, म्हणजे जबाबदारी संपली असे मानता कामा नये. मुलीच्या संसारात लुडबूड नको; परंतु मुलगी अडचणीत असेल, तर तिच्यामागे ठामपणे उभे राहायला हवे. वैष्णवीने पूर्वीही विष घेतले होते, याचा अर्थ तिचा सासरी नांदताना सहनशीलतेचा संयम संपला होता, असा होतो. अशा वेळी तिला पुन्हा सासरी पाठवायलाच नको होते. एवढा खर्च करूनही सासरची मंडळी वारंवार पैशाची मागणी करीत असतील, तर कितीही वेळा मागणी पूर्ण केली, तरी मागण्या संपणाऱ्या नसतात. हाव कमी होत नाही. वैष्णवीच्या आईवडीलांना हे कळायला हवे होते.

वधूच्या कुटुंबाकडून वराच्या कुटुंबाला रोख रक्कम किंवा वस्तू दिल्या जातात. हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार ही प्रथा बेकायदेशीर असली, तरीही भारतात अजूनही अनेक ठिकाणी ती छुप्या स्वरुपात सुरू आहे. काही वेळा हा हुंडा ‘स्वेच्छेने दिला’ असे म्हणत स्वीकारला जातो, तर काही वेळा हुंडा दिला नाही, तर महिलांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले जातात. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस्‌‍ ब्यूरो (एनसीआरबी) च्या अहवालानुसार, २०१७ ते २०२१ या कालावधीत भारतात एकूण ३५,४९३ हुंडाबळीच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. याचा अर्थ असा, की दररोज सरासरी २० महिलांचा हुंड्यामुळे बळी जातो. या मृत्यूंपैकी बहुतांश घटना उत्तर भारतात घडतात, जिथे सामाजिक दबाव, पितृसत्ताक मूल्ये आणि आर्थिक असमानता अधिक तीव्र आहे. उत्तर प्रदेश ७,०४८, बिहार ४,८९१, मध्य प्रदेश २,९७९, पश्चिम बंगाल २,५७६, राजस्थान २,२७६, महाराष्ट्र ९९८, आंध्र प्रदेश ८६९, ओडिशा ७८५, झारखंड ७२१, कर्नाटकात ६११ महिलांचे हुंडाबळी जातो.

महाराष्ट्र देशाच्या औद्योगिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगत राज्यांपैकी एक मानले जाते; परंतु हुंडाबळीच्या बाबतीत राज्याचा सहावा क्रमांक असणे, हे सामाजिक विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. शहरी भागात शिक्षण आणि आर्थिक स्थैर्य असूनही, मानसिकता अजून बदललेली नाही. विशेषतः ग्रामीण भागात हुंड्याची मागणी ही एक सामान्य प्रथा मानली जाते. पुरोगामी पुढारलेल्या आणि २१ व्या शतकातील पुण्यातील हे भयावह वास्तव आहे. विशेष म्हणजे, वर्षाला साधारण तीनशेहून अधिक गुन्हे हे विवाहितांच्या छळाचे गुन्हे नोंद होत आहेत. त्यामुळे अश्ाा प्रकरणात कडक शासन होणे, हेच पहिले पाऊल या घटनांना रोखण्यासाठी असेल असे म्हणले जात आहे. पुणे,पिंपरी-चिंचवडसारख्या प्रगत व झपाट्याने वाढणाऱ्या शहरातील हे विदारक चित्र आजच्या सुशिक्षीत म्हणविणाऱ्या समाजाचे वास्तव आहे. महिला आज पुरूषाच्या खांद्याला-खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कर्तव्य बजावत आहेत.

शासन तसेच विविध सामाजिक संघटनांकडून महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेऊन त्यांना बळ देण्याचे प्रयत्न केले जात आहे; मात्र आजही महिलांना उंबऱ्याच्या आत ठेवून त्यांच्यावर हक्क गाजविण्याच्या पुरूषी मानसिकतेत पूर्णत: बदल झालेला नाही असेच या घटनांवरून दिसत आहे. महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. नोकरी, शाळा तसेच घरात शिरून तिची छेड काढली जाते. शहरी भागातील हे चित्र भयावह आहे.

सांस्कृतिक व शिक्षणाच्या माहेर घरात या घटना घडत असून, तिचा छळ केला जात आहे. पोलिस दप्तरी नोंदी झालेल्या या घटना आहेत. पोलिसांपर्यंत न पोहचलेल्यांची संख्याही मोठी आहे. हुंड्यापासून कौटुंबिक हिंसाचार ते अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली कुटुंब विवाहितांचा छळ करत आहेत. प्रथम या विवाहित त्रास सहन करतात; मात्र अतिरेक झाल्यानंतर त्याची वाच्यता होते. आई-वडिल तसेच नातेवाइकांना या गोष्टी सांगितल्या जातात. त्यातून दोन्ही कुटुंबातील वडिलधारी मंडळी एकत्रित येऊन मार्ग काढतात; मात्र काही दिवस सुखाने गेल्यानंतर पुन्हा छळ सुरू होतो. अशावेळी या विवाहिता सततच्या त्रासाला कंटाळूनजीवन संपवितात. पुण्यासारख्या सुसंस्कृत, सांस्कृतिक आणि शिक्षणाच्या माहेर घरात गेल्या वर्षात जाचाला कंटाळून २०७ विवाहितांनी जीवन संपविले आहे.

अगदी शुल्लक कारणावरून विवहितांचा मानसिक व शारिरीक छळ केला जातो. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम ८० नुसार, एखाद्या विवाहित महिलेचा मृत्यू विवाहाच्या सात वर्षांच्या आत जळणे, शारीरिक जखम किंवा संशयास्पद परिस्थितीत झाला असल्यास व तिच्या मृत्युपूर्वी तिचा नवरा किंवा त्याचे नातेवाइक हुंड्याच्या मागणीसाठी तिचा छळ किंवा अत्याचार करत असल्याचे सिद्ध झाले, तर ही घटना ‘हुंडाबळी’ म्हणून गणली जाते. कलमानुसार अशा प्रकरणांत कठोर शिक्षा ठोठावली जाऊ शकते. आरोपी पती किंवा त्याचे नातेवाइक दोषी आढळल्यास त्यांना आजीवन कारावास किंवा किमान सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. ‘बीएनएस’अंतर्गत कलम १०८ मध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस आत्महत्या करण्यास उद्युक्त करते किंवा त्यास मदत करते, तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो. याअंतर्गत दोषी आढळलेल्या व्यक्तीस दहा वर्षांपर्यंतची तुरुंगवास व दंडही होऊ शकतो. या कलमाचा उद्देश मानसिक त्रास, छळ किंवा दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पडणाऱ्या घटनांना आळा घालणे हा आहे.

पुण्याचा विस्तार वाढला आहे. काही विवाहितांकडून स्वार्थासाठीही महिला कायद्याचा आधार घेऊन पतीसह त्याच्या कुटुंंबीयांना धमकाविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे काही घटनांमधून समोर आले आहे. पुण्यात गेल्या वर्षात पत्नी व तिच्या कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून पतींनी आत्महत्या केल्याचे दोन प्रकार घडलेले आहेत. तुला स्वयंपाक येत नाही. लग्नात तुझ्या वडिलांनी आमचा मानपान केला नाही. घर, दुकान तसेच गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण. तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यात अडचणी येत आहेत. तुझ्यामुळे मला येश येत नाही. घरात सतत कोणी तरी आजारी पडत आहे. मूल बाळ होत नाही, चारित्र्यावर संशय तसेच तुझ्या कुटुंंबीयांनी जादूटोणा केला आहे. यासह अशा अनेक कारणांवरून विवाहितांचा छळ होत असल्याचे पोलिसांकडे आलेल्या तक्रारींमधून समोर आले आहे. हुंड्याच्या घटनांत शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले, तर अशा प्रकारांना आळा बसू शकतो.