India’s First Agri Hackathon in Pune: शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पुण्यात १ ते ३ जून रोजी देशातील पहिली कृषी हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून निवडण्यात आलेली १६ अभिनव तंत्र संशोधने खरीप हंगामापासून राज्यातील विविध विभागांमध्ये शेती उत्पादन वाढवण्यासाठी वापरली जाणार आहेत. त्यांची कार्यक्षमता तपासल्यानंतर ही संशोधने देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
३ जून रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संशोधनांना राज्याला समर्पित करतील. जिल्हाधिकारी डुडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या स्पर्धेचा मुख्य उद्देश नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, जलसंवर्धन, यांत्रिकीकरण, पीक संरक्षण, नूतनीकरण ऊर्जा, कृषी अर्थशास्त्र आणि अन्य तंत्रज्ञान अशा आठ क्षेत्रांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. दीड हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, त्यातून शास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञांनी ५५१ तंत्र संशोधनांची निवड केली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, कृषी हॅकेथॉन स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाईल. यंदा केवळ शेती क्षेत्रातील संशोधनांचा यात सहभाग आहे, तर पुढील वर्षांपासून पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन विषयक संशोधनांचाही यात समावेश केला जाईल. यामुळे शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































