पुणे : कोरेगाव भिमा येथे शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून २५० व्हॉट्सॲप ग्रुपला पोलिसांनी नोटीस बजाविल्या आहेत. सोशल मिडिया व व्हॉट्सॲप ग्रुपवर कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट आली आणि ती पोलिसांच्या निदर्शनास आली तर अशा प्रत्येक ग्रुप ॲडमिनवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
शिक्रापूर व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल २५० ग्रुप ॲडमिनला पोलिसांकडून तशा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांकडून इन्स्टाग्राम, टिकटॉक, हॅलो ॲप आदींसह फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या राज्यातील सर्व सोशल मीडिया ग्रुपवर लक्ष ठेवले जात आहे.
कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आली आहे. दरम्यान, १ जानेवारी २०१८रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.