प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

मोयगाव बु. व पिंपळगाव गोलाईत आयोजित आई भवानी देवराईतील वृक्षारोपण सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला वनप्रेमींची मोठी गर्दी जमली होती. या सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज म्हणाले, “प्रकृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही, तर आधीपासून असलेल्या वृक्षांचे संगोपन करणे तितकेच आवश्यक आहे.”

गेल्या काही वर्षांत आई भवानी देवराई परिसरात तब्बल ३२०० झाडे लावून त्यांचे काटेकोर संगोपन करण्यात आले आहे. आज हा परिसर हिरवाईने नटलेला असून पर्यावरण संवर्धनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. या कार्यात इतिहास अभ्यासक डॉ. विश्वजीत सिसोदिया, महेंद्रसिंग कच्छवाह सर आणि संपूर्ण वसुंधरा फाउंडेशन टीमचे मोलाचे योगदान असल्याचे महाराजांनी गौरविले.

यावेळी आई भवानी देवराई – एक सचित्र वनगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. या पुस्तकात देवराई संकल्पनेचा इतिहास, पर्यावरण संरक्षणातील महत्व व भविष्यासाठी त्याचे योगदान यांचा सुंदर आढावा घेण्यात आला आहे.

कार्यक्रमात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांचा विशेष सन्मान करण्यात आला. समाजात धर्म, मूल्ये आणि जागृतीचा दीप प्रज्वलित केल्याबद्दल त्यांना “सन्मान चिन्ह” देण्यात आले. तसेच, ३२०० वृक्ष जगवून हरित क्रांती घडविणाऱ्या डॉ. विश्वजीत सिसोदिया यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला.

या कार्यक्रमाला डॉ. के. बी. पाटील, प.पू. श्यामचैतन्यजी महाराज, करणी सेनेचे प्रवीणसिंह पाटील, नजरकैद संपादक प्रवीण सपकाळे, स्थानिक सरपंच व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून हरित संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी, जळगावचे उद्योजक प्रवीणसिंहजी पाटील यांचा मोयगाव आणि पिंपळगाव या दोन्ही गावांत नागरी सत्कार करण्यात आला. महिला, युवक व आबालवृद्धांच्या सहभागामुळे हा वृक्षारोपण सोहळा एक संस्मरणीय पर्व ठरला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – आत्माराम पाटील