नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मध्यप्रदेशात पक्षाच्या आमदाराला निलंबित केल्याने कॉंग्रेसच्या समस्या काही प्रमाणात वाढल्या आहेत. २३० सदस्यांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा ११६ वर आहे.
सध्या कॉंग्रेसकडे बसपा आणि समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने ११७ आमदार आहेत. कॉंग्रेसचे ११४, समाजवादी पक्षाचे एक आणि बहुजन समाज पक्षाचे दोन आमदारांचा समावेश आहे. बसपा प्रमुखांनी पक्षाच्या आमदार रामबाई यांना निलंबित केल्यानंतर आता हा आकडा ११६ वर आला आहे.
राज्यात भाजपचे १०८ आमदार आहेत. तर अपक्षांची संख्या चार आहे. अशा परिस्थितीत इतर काही आमदारांचा पाठिंबा मिळविण्यात भाजपला यश आल्यास राज्यातील सध्याच्या कॉंग्रेस सरकारसाठी हा मोठा धोका ठरू शकतो. त्यामुळे कॉंग्रेसने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान भाजपच्या देखील बैठकी वाढल्याचे राजकीय वर्तुळात चित्र आहे.
मध्य प्रदेशातील पाथेरिया येथील बहुजन समाज पक्षाच्या आमदार रमाबाई परिहार यांनी नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. बसपा प्रमुख मायावतींनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली. पक्ष शिस्तीचे पालन न केल्यामुळे कारवाई केल्याचे मायावतींनी म्हटले आहे.