मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज करण्यात येत आहे. जवळपास महिनाभराने उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा विधानभवनात सुरु आहे. कायद्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ करता येते. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह सात जणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आज ३६ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळणार हे अपेक्षितच मानले जात होते. या विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे चर्चेत असणारे मंत्री ठरले आहेत. सरकार स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू असताना अजित पवार यांनी राजकीय क्षेत्रात भूकंप घडवत भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. हा प्रकार पवारांसह सर्वांसाठीच धक्कादायक होता. परंतु त्यानंतर आता अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी मध्ये येऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. एका महिन्या मध्ये दोन वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे पवार घराण्यातील पहिले नेते ठरले आहेत.