पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह अपारदर्शकतेमुळे गैरव्यवहारांना खतपाणी!
पिंपरी-चिंचवड शहरातील रेशन धान्य दुकानांच्या तपासणीबाबत पुरवठा विभागाकडून सुरू असलेली लपवाछपवी आता नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. शहरातील गरीब व गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये (PDS) नियमीत तपासणीचा अभाव असल्याचे समोर आले आहे.
अनेकवेळा विचारणा करूनही तपासणीसंदर्भात पुरवठा विभागाकडून ठोस माहिती दिली जात नाही, त्यामुळे विभाग अपारदर्शक कारभार करत असल्याचा संशय बळावला आहे.
पिंपरी, भोसरी आणि चिंचवड (निगडी) या तीन विभागांत पुरवठा कार्यालये कार्यरत असतानाही दुकानांची तपासणी नियमितपणे होत नसल्याचे वृत्त आहे. यामुळे धान्याच्या वाटपात गैरप्रकार होण्याची आणि गरजूंना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
धान्य योग्य प्रमाणात, ठरलेल्या दरात मिळतेय की नाही; तसेच निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होत नाही ना, याची खात्री करण्यासाठी तपासणी होणे आवश्यक आहे. याशिवाय, दुकानाचे वेळापत्रक पाळले जाते का, साठ्याची माहिती फलकावर प्रदर्शित आहे का, हेही तपासले जाते. मात्र, या तपासण्याच अनियमित असल्याने मूळ उद्देश सफल होत नाहीये.
नागरिकांची तीव्र मागणी
नागरिकांकडून रेशन दुकाने नियमितपणे तपासली जावीत, त्याचे पारदर्शक अहवाल प्रसिद्ध व्हावेत आणि गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण
याबाबत बोलताना ‘अ’ झोन, निगडीचे पुरवठा अधिकारी विजय क्षीरसागर यांनी नागरिकांनी गैरप्रकार करणाऱ्या दुकानदारांची तक्रार पुरवठा विभागाकडे करावी; त्या दुकानांची तपासणी करण्यात येईल, असे म्हटले आहे. परंतु, तपासणीची नियमितता आणि माहितीची उपलब्धता यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. या ढिसाळ कारभारावर ठोस उपाययोजना कधी होणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे















































