पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन; १०० कोटींच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री स्तरावर मंजुरीची तयारी
बडनेरा मतदारसंघातील कोंडेश्वर परिसरात उभारण्यात येणाऱ्या “बोधीभूमी आध्यात्मिक-सांस्कृतिक संकुला”च्या पायाभरणीचा शुभारंभ सोमवार, दि. १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते होणार आहे. आमदार रवी राणा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत शासनाने या प्रकल्पासाठी १० एकर जागा आणि ५ कोटी रुपये मंजूर केले असून, एकूण १०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अंतिम मंजुरी मिळवून देण्यात येणार आहे.
या भव्य प्रकल्पाचे आयोजन सृजनशील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक सेवामंडळ, अमरावती तर्फे करण्यात आले आहे. भूमिपूजन सोहळ्याला आमदार रवी राणा, माजी लेडी गव्हर्नर आई कमलताई गवई, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, कीर्ती गवई (अर्जुन), संस्थेच्या अध्यक्षा कलावती भटकर, कोषाध्यक्ष अन्नपूर्णा दामले, सचिव अश्विनी भटकर, वैदर्भी मेश्राम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कोंडेश्वरच्या निसर्गरम्य परिसरात उभे राहणारे हे संकुल बडनेरा मतदारसंघाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विकासाला नवी दिशा देणार आहे. संकुलात तथागत गौतम बुद्धांची ५१ फूट उंच मूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संविधान भवन, विपश्यना केंद्र, ५०० विद्यार्थ्यांसाठी निवासी अभ्यासिका, आर्ट गॅलरी आणि रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे.
समता, शांतता, करुणा आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देणारे हे “बोधीभूमी” संकुल अमरावतीच्या धार्मिक व शैक्षणिक क्षेत्राला नवी ओळख देईल, असे आमदार रवी राणा यांनी सांगितले.
या उपक्रमाबद्दल समाजातील विविध मान्यवरांनी आमदार रवी राणा यांचे कौतुक केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सागर डोंगरे









































