शीतल तेजवानीच मुंढवा जमीन गैरव्यवहारात आरोपी; आरोपपत्रातून पार्थ पवार, दिग्विजय पाटील गायब

पुणे २ फेब्रुवारी २०२६ : पुण्यातील मुंढवा परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात पूर्वी पार्थ पवार यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. मात्र, नुकत्याच सादर करण्यात आलेल्या 1886 पानी विस्तृत चार्जशीटमध्ये त्यांचे आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या घडामोडीने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात सादर केलेल्या या दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानी यांचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार या दोघांना या टप्प्यावर दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. मात्र आता या दोघांविरोधातील तपासाची दिशा काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी कालच केली होती. त्यानंतर हे आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती समोर आली. शीतल तेजवानी हिला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी मानत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. या कारवाईमुळे कायदेशीर प्रक्रिया पुढे सरकली असली, तरी अनेक शंका उपस्थित झाल्याचे दिसते.

या संदर्भात, महाराष्ट्र हा फक्त राजकीय दलालीचा अड्डा झाला आहे का? कायदा फक्त सामान्यांसाठीच आहे का? असा सवाल करणारी पोस्ट अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. शीतल तेजवानी यांनी एसपी सिव्हिल सूट 2213/2025 दिग्विजय पाटील यांच्या विरोधात दाखल करत व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे, तर दिग्विजय पाटील यांनी एसपी सिव्हिल सूट 2347/2025 शीतल तेजवानी यांच्या विरोधात दाखल केल्याचं त्यांनी म्हंटल आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 8/12/2025 रोजी हा व्यवहार अवैध ठरवत तो रद्द करण्यात यावा, यासाठी अर्ज केल्याची नोंद असून, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार? कशी देणार? हा व्यवहार गुंडाळून टाकला जाणार का? असे प्रश्न दमानीया यांनी उपस्थित केले. न्याय हा शब्द राजकारण्यांना लागूच होत नाही का? अशी विचारणाही त्यांनी केली.

आपल्या दुसऱ्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी ईओडब्ल्यूच्या कारवाईवर टीका करत म्हटले की, आरोपपत्र फक्त शीतल तेजवानीवरच दाखल झाले आहे. मग दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्यावरील चौकशीचे काय?.ही न्यायाची थट्टा आहे, असेही त्यांनी नमूद केले. या पोस्टमुळे या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक पातळीवर अधिकच चर्चेचे स्वरूप आले आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील पुढील सुनावणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत आणखी कोणते तपशील समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे प्रतिनिधी