तमिळनाडूच्या राजकारणात भाजपची भूमिका अद्याप मर्यादितच राहिली आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रभाव असूनही, राज्यात ‘तमिळ अस्मिता’ आणि ‘द्रविडीयन विचारसरणी’ या दोन घटकांमुळे भाजपला स्वीकारार्हता मिळवताना अडचणी येतात. हिंदी लादणीचा मुद्दा, केंद्र-राज्य संघर्ष, आणि प्रादेशिक अभिमान या भावना द्रमुकसारख्या पक्षांना नैसर्गिक फायदा देतात. त्यामुळे भाजपचीची रणनीती ही थेट सत्ता मिळवण्यापेक्षा आघाड्यांमधून प्रभाव वाढवण्यावर केंद्रित दिसते.
तमिळनाडूची विधानसभा निवडणूक ही केवळ सत्तांतराची लढाई नसते, तर ती राज्याच्या राजकीय आत्म्याची, सांस्कृतिक ओळखीची आणि सामाजिक समीकरणांची पुनर्रचना करणारी निर्णायक प्रक्रिया असते. २०२६ ची निवडणूकही त्याला अपवाद नाही. उलट, या वेळी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची, बहुआयामी आणि संक्रमणाच्या टप्प्यावर उभी आहे. द्रविडीयन राजकारणाच्या दीर्घ परंपरेत प्रथमच स्पष्ट द्विध्रुवीयतेत तिसऱ्या शक्तीची ठोस चाहूल लागली आहे. यामुळेच या निवडणुकीकडे केवळ तमिळनाडूच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सध्याच्या घडीला सत्तेवर असलेला एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुनेत्र कझघम (द्रमुक) हा पक्ष तुलनेने स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण स्थितीत आहे. २०२१ मध्ये सत्तेत आल्यानंतर स्टालिन यांनी ‘वेल्फेअर प्लस गव्हर्नन्स’ असा संतुलित नमुना उभा करण्याचा प्रयत्न केला. महिलांसाठी मोफत बस प्रवास, थेट आर्थिक सहाय्य, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील हस्तक्षेप यामुळे तळागाळात सरकारची पोहोच वाढली; परंतु ही लोकप्रियता निर्विवाद नाही. भ्रष्टाचाराचे आरोप, प्रशासनातील काही ढिसाळपणा आणि बेरोजगारीसारखे प्रश्न सत्ताधाऱ्यांसाठी आव्हान निर्माण करतात, तरीही विरोधकांमध्ये एकसंधता नसल्यामुळे सत्ताविरोधी लाट पूर्णपणे आकार घेताना दिसत नाही.
याच्या नेमक्या विरुद्ध स्थितीत अण्णाद्रविड मुनेत्र कझगम (अण्णाद्रमुक) या पक्षाची स्थिती आहे. जे जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाने आपली करिष्माई ओळख गमावली आहे. ई, पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक पुनर्बांधणीचा प्रयत्न सुरू असला, तरी अंतर्गत गटबाजी आणि मतभेद पूर्णपणे निवळलेले नाहीत. अण्णाद्रमुकत फूट पडली. ओ. पनीरसेल्वम यांचा गट आता द्रमुकला जाऊन मिळाला आहे. ही निवडणूक अण्णाद्रमुकसाठी केवळ सत्ता परत मिळवण्याची नाही, तर स्वतःचे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची लढाई बनली आहे. म्हणूनच त्यांनी भाजपसोबत युती करून ‘अँटी द्रमुक’ मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पारंपरिक द्वंद्वात यंदा सर्वाधिक चर्चेत असलेला घटक म्हणजे अभिनेते विजय. त्यांचा ‘तमिळगा वेट्री कझगम’ हा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला आह. तमिळनाडूच्या राजकारणात चित्रपटसृष्टीचा प्रभाव नवीन नाही. एम. जी रामचंद्रन आणि जयललिता यांची परंपरा त्याची साक्ष देते; मात्र विजय यांचा उदय हा वेगळ्या पद्धतीचा आहे. ते केवळ करिष्माई व्यक्तिमत्त्व नाहीत, तर युवा मतदारांमध्ये असलेल्या असंतोषाचे प्रतिनिधित्व करतात. पारंपरिक पक्षांबद्दलची नाराजी, रोजगाराच्या संधींचा अभाव आणि राजकीय पर्यायाची गरज या सर्वांचा संगम ‘टीव्हीके’ मध्ये दिसतो.
विजय यांचा पक्ष सत्तेपर्यंत पोहोचेल का, हा प्रश्न सध्या दुय्यम आहे. अधिक महत्त्वाचे म्हणजे, ते किती मते खेचतात आणि कोणाचे नुकसान करतात, हा खरा प्रश्न आहे. ‘टीव्हीके’ने शहरी, युवा आणि मध्यमवर्गीय मतांमध्ये घुसखोरी केली, तर त्याचा थेट फटका द्रमुकला बसू शकतो; परंतु काही विश्लेषकांच्या मते, ते अण्णाद्रमुकच्या पारंपरिक मतांनाही तडे देऊ शकतात. त्यामुळे ‘टीव्हीके’ हा ‘किंगमेकर’ नसला, तरी ‘गेमचेंजर’ ठरू शकतो. तमिळनाडूच्या निवडणुकीत जातीय समीकरणेही तेवढीच निर्णायक असतात. वन्नियार, थेवर, गौंडर, दलित आणि मुस्लिम मतदारांचे सूक्ष्म संतुलन प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळे परिणाम घडवते. द्रमुकने पारंपरिकरित्या दलित आणि अल्पसंख्याक मतांमध्ये मजबूत पकड ठेवली आहे, तर अण्णाद्रमुक काही प्रभावशाली जातीय गटांमध्ये आपली ताकद टिकवून आहे. भाजप या समीकरणात नव्याने प्रवेश करत असून, विशिष्ट समुदायांमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. प्रचाराच्या पातळीवरही ही निवडणूक वेगळी ठरत आहे. पारंपरिक सभा, रॅली आणि पदयात्रा यांसोबतच ‘सोशल मीडिया’, डेटा-आधारित मोहिमा, आणि ‘इन्फ्लुएन्सर पॉलिटिक्स’ यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. विशेषतः युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी डिजिटल रणनिती निर्णायक ठरत आहे.
द्रमुकने सरकारी योजनांची ‘डायरेक्ट बेनिफिट’ प्रतिमा उभी केली आहे, तर अण्णाद्रमुक-भाजप आघाडी सत्ताविरोधी मुद्दे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भर देत आहे. विजय यांचा प्रचार मात्र अधिक भावनिक, व्यक्तिमत्त्वकेंद्री आणि परिवर्तनाच्या आश्वासनावर आधारित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, ‘कुणाचे पारडे जड?’ या प्रश्नाचे उत्तर सरळ नाही. सध्याच्या घडीला द्रमुक आघाडी तुलनेने मजबूत दिसते. कारण सत्तेचा फायदा, संघटित रचना आणि स्पष्ट नेतृत्व; परंतु विरोधकांची एकजूट, ‘टीव्हीके’मुळे होणारे मतविभाजन आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे हे सर्व घटक अंतिम निकाल बदलू शकतात. तमिळनाडूचा मतदार अनेकदा ‘साइलेंट’ निर्णय घेतो आणि शेवटच्या क्षणी आश्चर्यचकित करतो, ही बाब विसरता येत नाही. ही निवडणूक केवळ सरकार ठरवणार नाही, तर तमिळनाडूच्या राजकारणाचा पुढील दशकाचा दिशादर्शक ठरेल. द्रविडीयन वर्चस्व कायम राहणार, की नव्या राजकीय शक्तींना जागा मिळणार, केंद्राच्या राजकारणाला कितपत प्रवेश मिळणार आणि मतदार पारंपरिक समीकरणांपलीकडे जाऊन नवा पर्याय स्वीकारणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे या निवडणुकीत दडलेली आहेत. त्यामुळेच पुढच्या महिन्यात होणारी तमिळनाडू विधानसभा निवडणूक ही केवळ एक निवडणूक नसून, बदलत्या भारतीय प्रादेशिक राजकारणाचा आरसा ठरणार आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ही केवळ मतांची किंवा जागांची लढाई नाही, तर राजकारणाच्या पद्धतीत होत असलेल्या बदलांची चाचणी आहे. द्रविडीयन परंपरेच्या मजबूत पायावर उभे असलेले हे राज्य आता सूक्ष्म सामाजिक गणित, डिजिटल प्रभाव आणि व्यक्तिमत्त्वकेंद्री राजकारण यांच्या संगमावर उभे आहे. त्यामुळे या निवडणुकीचे विश्लेषण करताना केवळ कोण जिंकेल यापेक्षा ‘कसे जिंकेल’ हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. सत्तेवर असलेला द्रमुक आणि त्यांचे नेतृत्व करणारे स्टॅलिन यांनी गेल्या काही वर्षांत ‘कल्याणकारी शासन’ हा राजकीय केंद्रबिंदू बनवला आहे. महिलांसाठी मोफत बसप्रवास, थेट आर्थिक मदत, सामाजिक सुरक्षा या योजनांमुळे सरकारने मतदारांशी थेट नाते निर्माण केले आहे. हे नाते केवळ घोषणांपुरते मर्यादित नसून प्रत्यक्ष लाभाच्या अनुभवातून तयार झालेले आहे. त्यामुळे सत्ताविरोधी भावना असली, तरी ती तीव्र आणि एकसंध लाट बनताना दिसत नाही. याच ठिकाणी एक सूक्ष्म विरोधाभासही आहे, ज्या योजना लोकप्रिय आहेत, त्याच आर्थिकदृष्ट्या कितपत टिकाऊ आहेत, हा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातो. दुसरीकडे अण्णाद्रमुकची पक्षरचना अजूनही स्वतःला सावरण्याच्या प्रक्रियेत आहे. जयललिता यांच्या अनुपस्थितीत करिष्म्याचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. ई. पलानीस्वामी यांनी संघटनात्मक पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला असला, तरी पक्षाच्या आतल्या स्तरावर एकजूट अजून पूर्णपणे निर्माण झालेली नाही. त्यामुळेच अण्णाद्रमुकने भाजपसोबत युती करून बाह्य बळ मिळवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ही युती केवळ जागा वाटपापुरती नसून, ‘विरोधी मतांचे एकत्रीकरण’ ही तिची मध्यवर्ती रणनीती आहे.
अण्णाद्रमुक-भाजप युती ही गणिताच्या दृष्टीने आकर्षक असली, तरी रसायनशास्त्राच्या दृष्टीने ती किती प्रभावी ठरेल, हा मोठा प्रश्न आहे. याच वेळी, या निवडणुकीत सर्वात मोठा ‘अनिश्चित घटक’ म्हणून समोर आले आहेत, विजय आणि त्यांचा ‘टीव्हीके’ हा पक्ष. तमिळनाडूच्या राजकारणात चित्रपटसृष्टीचा प्रभाव जुना असला, तरी आजचा काळ वेगळा आहे. पूर्वीचे नेते हे सत्ताकेंद्रित संघटनांसोबत जोडले गेले, तर विजय यांचा प्रभाव हा अधिक विखुरलेला, डिजिटल आणि युवककेंद्री आहे. त्यांच्या सभांमध्ये दिसणारी गर्दी ही केवळ राजकीय नाही, तर सांस्कृतिक आकर्षणाचाही भाग आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव मतांमध्ये कितपत रूपांतरित होईल, हे अद्याप अनिश्चित असले, तरी ते निवडणुकीच्या समीकरणात हस्तक्षेप करतील, हे निश्चित आहे. या निवडणुकीचे खरे स्वरूप मात्र ‘सूक्ष्म लक्ष्यीकरणा’त दिसते. तमिळनाडूत जातीय समीकरणे उघडपणे मांडली जात नसली, तरी ती राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. वन्नियार, थेवर, गौंडर, दलित या प्रत्येक सामाजिक गटाचे भौगोलिक आणि राजकीय वजन वेगवेगळ्या मतदारसंघांत निर्णायक ठरते. त्यामुळे उमेदवार निवड, आघाड्या आणि प्रचार या सर्व स्तरांवर जातीय गणित सूक्ष्मपणे वापरले जाते. ‘पट्टली मक्कल कच्ची’ (पीएमके) सारखे पक्ष विशिष्ट समाजघटकांना केंद्रस्थानी ठेवून आपले अस्तित्व टिकवून आहेत, तर मोठे पक्ष त्यांच्याशी तडजोड करून मतांचे ध्रुवीकरण साधतात; परंतु या वेळी एक नवा ट्रेंड ठळकपणे समोर येतो, तो म्हणजे ‘नॅनो-इन्फ्लुएन्सर’ राजकारण. पारंपरिक प्रचारसभांच्या जोडीला ‘सोशल मीडिया’वर छोटे-छोटे प्रभावक वापरून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. हे इन्फ्लुएन्सर्स थेट राजकीय संदेश देत नाहीत; पण कॉलेज जीवन, स्थानिक प्रश्न, मीम्स यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे मतमतांतरे घडवतात. विशेषतः द्रमुकने या तंत्राचा प्रभावी वापर केला आहे. यामुळे राजकारण अधिक सूक्ष्म, अप्रत्यक्ष आणि मानसशास्त्रीय बनत आहे. याचबरोबर, भाषा हा अजूनही अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी मुद्दा आहे. स्टॅलिन यांनी ‘तमिळ अस्मिते’चा मुद्दा उचलत हिंदी लादण्याविरोधात भूमिका घेतली आहे. हा मुद्दा केवळ भाषेपुरता मर्यादित नसून, तो केंद्र-राज्य संबंध, सांस्कृतिक स्वायत्तता आणि प्रादेशिक अभिमान यांच्याशी जोडलेला आहे. त्यामुळे तो भावनिक पातळीवर मतदारांना एकत्र आणण्याची ताकद ठेवतो.
भागा वरखडे










































