राजस्थान : राजस्थानमधील कोटा इथल्या जेके लोन रुग्णालयात एका महिन्यात जवळपास ७७ नवजात बाळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीने त्यांचा अहवाल सरकारकडे सोपवला आहे. या अहवालात समितीने उपचारात कोणताही बेजबाबदारपणा झाला नसल्याचं म्हटलं आहे. ऑक्सिजन पाईप नसल्यामुळे थेट सिलिंडरमधून ऑक्सिजन पुरवण्यात आला. चौकशीनंतर समितीने लहान मुलांचा मृत्यू सिंलिडरमुळे संसर्ग पसरून आणि थंडीने झाल्याचं म्हटलं आहे.
याबाबत एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, जेके लोनमध्ये ७७ मुलांच्या मृत्यूनंतर गांभीर्य पाहून सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने सोमवारी त्यांचा अहवाल सादर केला होता. या समितीमध्ये जयपुरच्या सवाई मानसिंग रुग्णालयातील दोन तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता.
समितीने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की, जेके लोन रुग्णालयात नियोनेटल आयसीयूमध्ये ऑक्सिजनची पाईप नाही. इथं सिलेंडरमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. यामुळे संसर्ग वाढला आणि मृतांचा आकडा वाढला. आता परिस्थिती सुधारण्यासाठी समितीने सल्ला दिला आहे. रुग्णालयात असलेल्या सध्याच्या उपकरणांची दुरुस्ती करून घ्या. एनआयसीयूमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाइपलाइन लावण्यात याव्यात. तसेच पीडियेट्रिक विभागाचा प्रमुख जेके लोनच्या रुग्णालयातच असावा असंही समितीने म्हटलं आहे.
कोटातील जेके लोन रुग्णालयात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्य सरकारने समितीची स्थापना केली होती. जयपूरमधील वैद्यकिय विद्यालयातील दोन तज्ज्ञ डॉक्टरांचा यामध्ये समावेश होता. या समितीने म्हटलं की, मुलांना थंडीत जीप किंवा इतर वाहनांमधून दवाखान्यात आणलं गेलं. हे मुलांच्या मृत्यूचं थंडी हे मोठं कारणं आहे.