पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला आज दोन वर्ष पूर्ण होत आहे. २०१८मध्ये याच दिवशी मोठया घटना घडल्या होत्या. ऐतिहासिक कोरेगाव लढाईचे सत्य नेमके काय? याबाबत सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात…
१ जानेवारी १८१८ रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धाला २०० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भीमा कोरेगावमध्ये हजारो नागरिक जमले होते. दरम्यान या कार्यक्रमाला गालबोट लागले आणि काही हिंसक घटना घडल्या.
विशेष म्हणजे या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर येथून झाली. राज्यभरात दुसऱ्या दिवशी याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष अनुसूचित समाज साजरा करतो. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर त्यातील एका समाजाचे सैनिक होते. त्याकाळी त्या समाजातील लोकांना अस्पृश्य मानण्यात येत.
पेशव्यांनी कोरेगावस्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी २००० सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली होती.
फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या या तुकडीने १२ तास खिंड लढवत मराठ्यांना जिंकू दिले नाही. यानंतर मराठ्यांनी निर्णय बदलला आणि ते परतले, असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. जेम्स ग्रांट डफ यांनी आपल्या ‘ए हिस्टरी ऑफ द मराठाज’ या पुस्तकात या लढाईचा उल्लेख केला आहे.
उघड्या मैदानात सैन्य अडचणीत सापडू नये, यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीने कोरेगावला आपला बालेकिल्ला म्हणून तयार केले. मोकळ्या ठिकाणी सैन्य राहिले असते तर मराठ्यांकडून मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले असते.
मृत जीवन जगण्यापेक्षा न्यायासाठी, हक्कासाठी लढत लढत मेलेले बरे, असा विचार करून भीमा कोरेगावच्या या लढाईत अनुसूचित समाजातील सैनिकांनी शेवटी इंग्रजांना विजय मिळवून दिला.