नीरा : छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेने ज्या विचारांच्या सहाय्याने घडवलं ते विचार आजच्या मातांनी आत्मसात करणे व त्यांच्या विचारांनुसार आपली पुढील पिढी घडवणे गरजेचे असल्याचे मत नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे यांनी व्यक्त केले.
जिजाऊंच्या जयंती निमित्त रविवारी (दि.१२) नीरा येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. नीरा( ता. पुरंदर) येथे राजमाता जिजाबाई भोसले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी नीरेचे माजी जि.प.सदस्य विराजमान काकडे, माजी सरपंच राजेश काकडे, माजी उपसरपंच दीपक काकडे, कर्नलवाडीचे माजी उपसरपंच भरत निगडे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे शिरीष काकडे,मिलींद बागडे, महेश धुमाळ, टी.के.जगताप, बाबा बागवान आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी राजेश काकडे म्हणाले की, जरी आपण आधुनिक युगात वावरत असलो तरी राजमाता जिजाऊंनी दिलेला विचारांचा वारसा आपल्याला आजही आवश्क आहे. त्यांनी ज्याप्रमाणे छत्रपतींना घडवले त्याचप्रमाणे आजच्या पिढीला घडवणे आवश्यक आहे. त्यासाठी महिलांबरोबरच पुरुषांनी सुद्धा पुढे यायला हवे. जिजाऊ कोणाला काय होत्या हे समजून घ्यायला हवे. त्यांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला, कोणाशी का लढावे? शिकवले, अन्यायाचा अत्याचाराचा सामना कसा करायचा हे शिकवले, शून्यातून स्वराज्य निर्माण करणारा राजाशिवछत्रपती त्यांनी घडवला. छत्रपती निर्माण केलेले स्वराज्य रक्षण करण्यासाठी त्यांनी मावळ्यांना प्रेरणा दिली.
२०० पेक्षा जास्त लढाया लागणारे व त्यात कधीही पराभूत न होणारे भक्कमपणे स्वराज्य सांभाळणारे संभाजी महाराज त्यांनी घडवले. म्हणूनच राजमाता जिजाऊंचे विचार आजही आपल्याला आवश्यक आहेत. भरत निगडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर दीपक काकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.