प्रशासनाच्या आदेशाला व्यापाऱ्यांकडून केराची टोपली

बारामती, दि. ७ ऑगस्ट २०२०: बारामती शहरात कोरोना संसर्ग झालेल्या ठिकाणी व परिसरात कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने या भागाला प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर केल्यावर त्या भागातील रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात येत आहेत. मात्र तेथील व्यापारी स्थानिक नेत्यांना हाताशी धरुन आपत्ती व्यवस्थापन कायदा न मानत शासनाला वेठीस धरुन कोरोना प्रतिबंधक क्षेत्रात दुकाने उघडुन व्यवसाय करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बारामती शहरातील मुख्य बाजारपेठेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढल्यावर बंद केलेले रस्ते दुसऱ्या दिवशी खुले केले जातात म्हणजे शासन व प्रशासनाच्या आदेशाला हे व्यापारी जुमानत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात शहरातील नागरिक करत आहेत.

बारामती शहरात रोज मोठ्या संख्येने कोरोना संसर्गाची बाधा झालेले रुग्ण आढळत असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या किंवा त्याची बाधा वाढू नये यासाठी शासनाकडून कोरोना प्रतिबंधक क्षेत्र जाहीर करून त्या परीसरात बॅरिकेट लावून आतमध्ये येणारे व बाहेर जाणारे रस्ते ठरलेल्या दिवसांसाठी बंद केले जातात. मात्र, शहरातली मध्यवर्ती मुख्य बाजारपेठेतील व्यापारी आत मध्ये दुकाने उघडुन बॅरिकेटच्या बाहेरून ग्राहकांकडून पैसे घेऊन खाद्यपदार्थ, कपडे व इतर व्यवसाय करत आहेत.

प्रशासनाच्या निर्णयाला न जुमानता कोणाच्या आदेशाने किंवा दबाव टाकत हे रस्ते खुले केले जात आहेत. तर काही ठिकाणी बांधलेल्या बॅरिकेटचे अंतर दुसऱ्या दिवशी कमी होत आहे. तर काही ठिकाणी बंद केलेल्या रस्त्यावरील एकेरी वाहतूक सुरू होते आहे. काही रहिवाशी तर आमच्याकडे बॅरिकेट बांधू नका म्हणून पालिकेच्या लोकांशी हुज्जत घालत आहेत.

मात्र, हे सगळे करत असताना शासनाचा मूळ उद्देश तर पायदळीच तुडवला जात आहे. कारण कोरोनाची बाधा झालेल्या परिसरात भाड्याचे बॅरिकेट लावणेव  नगर पालिकेचे कर्मचारी, अधिकारी, पोलीस यांच्यावर होणारा शासनाचा लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी माझ्या दुकानासमोर बांधताय मग शेजारच्या दुकानासमोर पण बॅरिकेट बांधा अशी आडमुठी भूमिका घेतली आहे. तर काही ठिकणी व्यापाऱ्यांनी स्वतःच बॅरिकेट उघडले आहे. सध्या रस्त्यावर पोलीस प्रशासन दिसत नाही व कोरोना प्रतिबंधित क्षेत्र करत असताना काही नागरिकांनी बारामती नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना न जुमानता अरेरावी केल्याचे प्रकार देखील घडत आहेत. तर शासन व प्रशासनाच्या सूचना बारामती शहरातील व्यापारी ऐकत नाहीत का? हे व्यापारी कोणाचा दबाव आणून शासनाच्या आदेशाला जुमानत नाहीत असा सवाल बारामतीतील नागरिकांच्या मध्ये चर्चा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा