एक मोठी कारवाई ट्रक्टर ट्रॉली भरुन स्फोटके जप्त! १० नक्षली जेरबंद; मोठ्या हल्ल्याचा कट उधळला

13

छत्तीसगड, २३ मे २०२३: छत्तीसगड-तेलंगणा राज्यांच्या सीमेवर १० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ट्रक्टर ट्रॉलीमध्ये भरलेली स्फोटके जप्त करण्यात आली असून, या वर्षातील मोठ्या हल्ल्याचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. जेरबंद केलेल्या पाच नक्षली हे विजापूरचे रहिवासी आहेत. तेलंगणाच्या भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी सीमा भागात कारवाई केली आहे.

या कारवाई संदर्भात तेलंगणा पोलिसांनी माहिती दिली आहे की, नक्षलवादी मुलाकानपल्ली हा दुमुगुडेम येथे मोठ्या प्रमाणात स्फोटकांसह लपला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी दुमुगुडेम पोलिस आणि सीआरपीएफच्या १४१ व्या बटालियनच्या जवानांचा समावेश असलेली एक टीम तयार केली. सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरातील गावे आणि जंगलात शोधमोहीम राबवली. या कारवाईत १० संशयितांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आले आहे.

हा सर्व दारुगोळा नक्षली नेत्यांनी मागवला होता, असे अटक केलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांना सांगितले. त्याचा वापर हल्ल्यासाठी केला जाणार होता. या सर्वांच्या चौकशीत अनेक खुलासेही झाल्याचे भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांची किंमत लाखोंच्या घरात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर