अर्थ मंत्रालयाची मोठी घोषणा ; नवीन संसद भवनाच्या उद्धाटन स्मरणार्थ ७५ रुपयांचे नाणे लॉन्च करणार

नवी दिल्ली, २६ मे २०२३ : देशाच्या अर्थ मंत्रालयाने आज मोठी घोषणा केली आहे. २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्धाटन होणार आहे. या अविस्मरणीय क्षणांच्या स्मरणार्थ अर्थ मंत्रालयाकडून ७५ रुपयांचे नाणे लॉन्च केले जाणार आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नवीन संसद भवनाचे उद्धाटन होणार आहे. या उद्धाटन कार्यक्रमाला जवळपास २५ पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान २० विरोधी पक्षांनी नवीन संसद भवन उद्धाटनच्या कार्याक्रमावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या राजकीय खडाजंगीमध्येच अर्थ मंत्रालयाकडून नवीन भारतीय चलनाची आज घोषणा करण्यात आली आहे.

या ७५ रुपयांच्या नाण्याविषयी अधिक माहिती सांगताना मंत्रालयाने म्हटले आहे की, हे नाणे गोलाकार असून, त्याचा व्यास ४४ मिलीमीटर असणार आहेत. तसेच या नाण्यावर संसद परिसर आणि नवीन संसद भवनाची प्रतिमा असेल. संसद परिसराच्या प्रतिमेच्या खाली आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये ‘२०२३’ हे वर्ष देखील कोरलेले असणार आहे. तसेच हे नाणे ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्त असलेले मिश्रधातूचे बनलेले असेल. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा