मुंबई, २१ नोव्हेंबर २०२२ : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान लवकरच ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटातून प्रेक्षकांना भेटणार आहे. या चित्रपटातील सैफच्या लूकने अनेक वादांना आमंत्रित केले. रामायणाचे कथेवर आधारित या चित्रपटात त्याने रावणाची भूमिका साकारली आहे. वादामुळे ‘वीएफएक्स’द्वारे सैफ याचा लूक बदलण्यात येत असल्याचे सांगितले गेले. तर सैफबरोबर प्रभास आणि कीर्ती सेनाॅन यांची देखील मुख्य भूमिका बघायला मिळणार आहे. अभिनेता सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांचे मुख्य भूमिका असलेला ‘विक्रम वेदा’ हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. याचे कारण सैफ अली खान यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
बिग बजेट चित्रपटाचा कमाईचे आकडे कमी दिसणं खूप निराशाजनक असतं. ‘विक्रम वेदा’सारखा चित्रपट चांगली कमाई का करू शकला नाही, याचं माझ्यासमोरही मोठं कोडं आहे. ‘विक्रम वेदा’ या चित्रपटाकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या; मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही, असं मत सैफ अली खान यांनी व्यक्त केलं. “प्रेक्षकांना कधी काय आवडेल आणि काय आवडणार नाही हे सांगता येत नाही. तसंच काही कलाकार एका चित्रपटासाठी भरमसाट फी घेतात जी खरंच खूप जास्त असते. त्या बदल्यात चित्रपटाची कमाई तेवढी होत नाही,” असंही त्याने सांगितलं.
जेमतेम २ ते ३ टक्के लोकसंख्याच तिकिटाचे पैसे भरून थिटरमध्ये जाऊन चित्रपट पाहते. ही टक्केवारी ३० ते ४० टक्क्यांमध्ये बदलली तरच बॉलीवूड इंडस्ट्रीत भरभराट होऊ शकते, असेही मत सैफ याने या मुलाखतीत व्यक्त केले. कारण एखादा चित्रपट फ्लॉप ठरल्यास निर्मात्यांना त्याचा खूप मोठा फटका बसतो. त्यातून मुख्य कलाकार भरमसाट फी घेतात. त्यामुळे नुकसान भरून काढणे खूप कठीण जाते. सैफ अली खानचा नवीन चित्रपट आदी पुरुष प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे