परमबीर सिंग यांच्यावर गुन्ह्यांचं सत्र सुरूच, दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल

मुंबई, २४ जुलै २०२१: मुंबई आणि ठाणे शहराचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग त्यांच्या अडचणीत रोजच वाढ होताना दिसतेय. परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर परवाच गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. माध्यमांमध्ये ही बातमी जुनी झाली नाही तोच परमवीर सिंग यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिंग यांनी शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी परमवीर सिंग यांच्याविरुद्ध कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, ४२०, ३६४ ए, ३४ ,१२० बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. परमबीर सिंग व्यतिरिक्त संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि मनेरे यांचीही नावे आहेत. परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना मनारे हे त्यावेळी ठाण्याचे गुन्हे शाखेचे डीसीपी होते.

परमबीर सिंग आणि अनिल देशमुख प्रकरण
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा