गोल पोस्ट गुन्हा सामूहिक अत्याचार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

सामूहिक अत्याचार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

उस्मानाबाद, २१ ऑक्टोबर २०२०:उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यामधील सास्तूर या गावामध्ये १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी घडली असल्याचे समोर आले. या प्रकरणातील संबंधित आरोपींवर मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित पीडित मुलीवर सोमवारी त्याच गावातील मुलांनी पाळत ठेवली आणि तिच्यावर सामूहिकपणे अत्याचार केला. यानंतर, पीडित मुलीची प्रकृती खालावल्याने तिच्या पालकांनी तेथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात उलट्या आणि जुलाब होत असल्याचे कारण देऊन तिला तेथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता, तिने आपल्या वर चौघांनी मिळून अत्याचार केल्याचे सांगितले. पीडित मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित प्रकरण पोलीसांना समजल्यावर ते पिडीत मुलीच्या पालकांकडे गेले मात्र पालकांनी याबाबत एफ आय आर नोंदवली नसल्याचे कळते .

या सर्व प्रकरणाची माहिती औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांना समजल्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालय, लातूर येथे जाऊन संबंधित पालकांची भेट घेतली. तसेच, मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने आरोपींवर अद्यापही कोणता गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप त्यांनी काल दिनांक २० ऑक्टोबर रोजी सकाळी केला.

पिडीत मुलीच्या पालकांनी काल दिनांक २० ऑक्टोबर रोजी लातूर येथे महिला पोलीस अधिकाऱ्याला जवाब दिला. या जवाबावरून लोहारा पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा या प्रकरणातील आरोपीं विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच, या प्रकरणातील पुढील तपास हा प्रभारी पोलीस निरीक्षक आर. एम. जगताप हे करत आहेत.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version