नवी दिल्ली, दि. १४ जून २०२०: गेल्या २४ तासात कोविड-१९ चे ८,०४९ रुग्ण बरे झाल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ५०% हून अधिक झाला आहे. कोविड-१९ चे आत्तापर्यंत एकूण १,६२,३७८ रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६०% आहे. यावरून हे निदर्शनास येते कि कोविड-१९ च्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. संक्रमित लोकांचे वेळेवर निदान आणि योग्य उपचार व्यवस्थापन हाच रुग्ण बरे होण्याचा मार्ग आहे. सध्या १,४९,३४८ सक्रिय रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआर ने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोगशाळांची संख्या ६४६ पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या २४७ पर्यंत वाढविण्यात आली आहे. (एकूण ८९३ प्रयोगशाळा). गेल्या २४ तासांत १,५१,४३२ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण ५६,५८,६१४ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली बैठक
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कोविड -१९ च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसह दिल्लीचे नायब राज्यपाल आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक घेतली. बैठकीत नियंत्रण उपायांचे बळकटीकरण, चाचणीचा वेग वाढविणे आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांची पुरेशी तयारी यावर चर्चा झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी