पोलिसांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी संगणक अभियंत्याला पिंपरी चिंचवड मध्ये अटक

पिंपरी चिचंवड, ८ ऑक्टोबर २०२२: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट असून, मुंबईमध्ये आणि रेल्वेस्टेशनवर बॉम्बस्फोट घडवून आणला जाणार असल्याची खोटी माहिती दिल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड मधील एका संगणक अभियंत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, मनोज अशोक हंसे असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. आरोपी हंसे याने आपल्या घराच्यावरील सदनीकेमध्ये बॉम्ब बनविण्याचे काम सुरू असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षामध्ये केला होता. या फोनमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले परंतु त्या ठिकाणी तसे काहीही आढळून आले नाही.

यानंतर पोलिसांनी त्याबाबत आरोपीला जाब विचारला. त्यावेळी त्याने पोलिसांनाच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या बाबत त्याला अटक करण्यात आली. संबंधित उच्चशिक्षित आरोपी वैफल्यग्रस्त असल्याने त्याने असे कृत्य केले असल्याची शक्यता पोलिसांनी सांगितली.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा