हडपसर, दि.९मे २०२०: पुणे- बंगळुरु महामार्गावर उंब्रजजवळील भोसलेवाडी गावाच्या हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर पत्नीसह तिचा पती असे दोघे जण जागीच ठार झाले. ही घटना आज (शनिवारी) पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली.
अमित आप्पाजी गावडे ( वय ३८ ) डॉ. अनुजा अमित गावडे (वय ३५ दोघे रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, हडपसर, पुणे ) अशी अपघातात मृत झालेल्या पती पत्नीची नावे आहेत.
याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा ते कराड लेनमधून कोल्हापूरकडे जाणारी कार (एमएच १२ जेयू. ८८९२) ही भोसलेवाडी हद्दीतून भरधाव वेगात जात असताना चालकाचा गाडी वरील ताबा सुटल्याने गाडी महामार्गाच्या दुभाजकाला धडकून सातारा लेनवर पलटी झाली. यामध्ये गाडी मधील अमित गावडे व डॉ. अनुजा गावडे गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले.
अपघातातील दाम्पत्य त्यांच्या मुलाला कोल्हापूरला आणण्यासाठी जात असल्याची माहिती घटनास्थळावरून समजली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून अपघाताची माहिती समजताच उंब्रज पोलीस, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, सलीम देसाई, रमेश खुणे यांनी अपघातस्थळी तत्काळ धाव घेऊन मदत कार्य केले.
अपघातात दाम्पत्य जागीच ठार झालेच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.व हडपसर मेडिकल असोसिएशनवर शोककळा पसरली आहे. या दाम्पत्याला हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी-ज्ञानेश्वर शिंदे