आज बंगळुरूतील बैठकीमध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता

बंगळुरु,१८ जुलै २०२३ : भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणीत एनडीए आणि काँग्रेस प्रणीत यूपीए असा सामना पाहायला मिळू शकतो. सध्याच्या घडीला भाजपने सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपला रोखणे हाच विरोधी पक्षांचा उद्देश आहे. त्यासाठी आज बंगळुरुमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. देशातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने ही बैठक खूप महत्वाची मानली जात आहे.

भाजपा विरोधात रणनिती तयार करण्यासाठी काही महत्वाचे निर्णय या बैठकीत होऊ शकतात. काल देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या पक्ष प्रमुखांचे काँग्रेस नेत्यांनी बंगळुरुमध्ये जोरदार स्वागत केले आहे.काल रात्री स्नेह भोजनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या विरोधकांमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रातून या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत.

पण आज होणाऱ्या मुख्य बैठकीला शरद पवार उपस्थितीत आहेत.मोदी आणि भाजपा विरोधात रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक होत असली, तरी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते पदाबाबत महत्वाचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो.काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. पक्षात दोन गट पडले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट सत्तेत सहभागी झाला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दुसरा गट विरोधी बाकावर आहे. ही फूट पडण्याआधी राज्याचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. कारण त्यांचे आमदार अधिक आहे.परंतु आता फुटीमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या घटली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार अशी चर्चा आहे. आज बंगळुरुमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये यावर चर्चा होऊ शकते.

विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र केंद्रीय नेतृत्वाची शरद पवारांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. बंगळूरूत विरोधी पक्षनेते पदावर शिक्कामोर्तब झाले, तरी आज काँग्रेसकडून नाव जाहीर होणार नाही. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होऊनही विरोधी पक्षनेते पदाबाबत स्पष्टता नाही. आज बंगळुरूत राज्यातील परिस्थितीवर शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा होईल,असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा