आदित्यच्या खांद्याला खांदा लावून काम करायचाय : नितेश राणे

शिवसेना सोडल्यापासून भाजपमध्ये प्रवेश घेईपर्यंत नारायण राणे आणि शिवसेनेत उडालेल्या अनेक ठिणग्या पाहायला मिळाल्या आहेत.

पण आता नारायण राणे यांचे चिरंजीव आणि कणकवली मतदारसंघातले भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितेश राणे यांनी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी म्हटलं, “जर आदित्य ठाकरे विधिमंडळाचं कामकाज समजून घेण्यासाठी, कायद्यांची निर्मिती कशी होते हे समजून घेण्यासाठी निवडणूक लढवत असतील तर त्याचं स्वागत व्हायला हवं.”

आदित्य ठाकरेंनी घेतलेली भूमिका ही अतिशय सकारात्मक असल्याचं राणे यांनी म्हटलं.

“महाराष्ट्राच्या विकासात आणि जडण-घडणीत ते आमच्यासोबत बसून, आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असतील तर मी त्यांना शुभेच्छा देतो. विधानसभेच्या पायऱ्यांवर त्यांची भेट व्हावी, अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची माझी इच्छा आहे,” असं राणे यांनी म्हटलं.

शिवसेनेने नितेश राणे यांच्याविरोधात कणकवलीतून उमेदवार उभा केला आहे.

या ठिकाणी युतीचा धर्म पाळला गेला नाही असं तुम्हाला वाटतं का? असं विचारलं असता नितेश राणेंनी म्हटलं, “माझ्याविरोधात काय भूमिका घ्यायची हा शिवसेनेचा प्रश्न आहे. पण मी माझ्या बाजूने शिवसेनेवर टीका करणार नाही, त्यांचा विरोध करणार नाही. मी फक्त विकासाचा मुद्दा घेऊन लोकांचा विश्वास कमावण्यासाठी रिंगणात उतरलो आहे. इतरांवर टीका करून मी माझ्या मतदारांचा वेळ वाया घालवणार नाही.”

नितेश राणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला उपस्थित होते याबद्दल ते म्हणाले की “आपण ज्या पक्षात आहोत त्याची मातृसंस्था समजून घेणं आवश्यक आहे. त्यांची कार्यपद्धती काय आहे, कार्यकर्ते कसं काम करतात हे समजून घेणं आवश्यक आहे त्यामुळे मी काही पुस्तकं देखील घेतली आहेत.”

काँग्रेसमध्ये असताना 12 वर्षं लोकांची नाव कळण्यातच गेली पण या ठिकाणी आम्ही सर्व काही समजून घेऊन काम करू असं राणे म्हणाले.

आपल्या मुलांचं भवितव्य सुरक्षित राहावं यासाठी विविध पक्षातले नेते भाजपमध्ये येत आहेत असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. नारायण राणे हे भाजपमध्ये तुमचं भवितव्य सुरक्षित राहावं यासाठी आले आहेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न प्रतिनिधीने केला त्याला उत्तर देताना ते म्हणाले, “अमिताभ यांचा मुलगा अभिषेक चित्रपटसृष्टी येतो तेव्हा त्याला हा प्रश्न विचारला जात नाही, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा त्याला हा प्रश्न विचारला जात नाही, पण नेत्यांच्या मुलांना या प्रश्नाला सामोरं जावं लागतं.”

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा