नवी दिल्ली, २७ मार्च २०२३: “घोड्यांच्या शर्यतीत गाढव पळविला जात आहे,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी काँग्रेस व पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर आज हल्लाबोल केला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखी तीव्र बनल्या आहेत.
घोड्यांच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला गाढव मिळाला आहे. हा विषय खरे तर गंभीर आणि आत्मपरीक्षण करावयास लावणारा आहे, असा टोला पुरी यांनी मारला आहे. प्रियांका गांधी- वड्रा यांनी राहुल गांधी यांची तुलना भगवान रामाबरोबर केली होती. त्याचा संदर्भ देत पूरी यांनी ‘कुठे भगवान राम आणि कुठे हे लोक’ असे सांगितले आहे.
माफी मागण्यासाठी मी स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, असे राहुल गांधी म्हणतात. वास्तविक सावरकरांचे योगदान या लोकांना माहित आहे का? असा सवाल उपस्थित करुन पुरी म्हणाले की, न्यायालयाने गांधी यांना शिक्षा दिलेली आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्यांनी पुढील गोष्टी केल्या पाहिजेत. राजकारणात अतिनाट्य करण्याची गरज नाही. शेवटी जनतेला काय तो निर्णय करु द्यावा.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर