पेण जवळ सापडला एक डमी बॉम्ब

रायगड, ११ नोव्हेंबर २०२२ : मुंबई गोवा महामार्गावर पेणच्या जवळपास एक डमी बॉम्ब सापडल्याची घटना समोर आलीय. तर चार तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर बॉम्ब शोधक पथकाला हा बॉम्ब निकामी करण्यात यश आलंय. नवी मुंबई आणि रायगड बॉम्ब शोधक पथकानं ही कामगिरी यशस्वी केलीय.

मुंबई- गोवा महामार्गावर भोगावती पुलाखाली संध्याकाळी एका व्यक्तीला बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. त्यानंतर त्यानं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने पेण पोलिस तसेच नवी मुंबईची बिडीडीएस आणि रायगडमधील पथकं घटनास्थळी दाखल झाली. भोगावती नदीच्या पुलाच्या खालच्या बाजूला जिलेटीन सारख्या कांड्या सापडल्या होत्या. पथकाच्या तपासदरम्यान मध्यरात्री उशिरा नदीपात्रातून ही बॉम्बसदृश्य वस्तु बाहेर काढण्यात आली आणि बॉम्बशोधक पथकानं तपासणी केल्यानंतर हा एक बनावट बॉम्ब असल्याचं सांगितलं आहे. बॉम्बसाठी वापरण्यात आलेल्या जिलेटीनच्या कांड्याही खोट्या असून त्यात कुठलेही स्फोटक नसल्याचं समोर आलंय.

तसेच घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि गोवा महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही वेळ बंद करण्यात आली. तसेच आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला. पुलाखाली सापडलेल्या बॉम्बसदृश्य वस्तूत कुठलीही स्फोटकं आढळून आलेली नाही. या प्रकरणात पूर्ण खबरदारी घेऊन आम्ही या बॉम्बसदृश्य वस्तूम्हणजे बनावट बॉम्बची विल्हेवाट लावली आहे. कोणीतरी खोडसाळ वृत्तीने हा प्रकार केला असे करणाऱ्यांचा शोध आम्ही सुरू केला आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा