ऑनलाइन जाहिरातीद्वारे शेतकऱ्याने ९५ हजारांची बैलजोडी बुक केली; पण बैलजोडीच मिळाली नाही

पुणे, २४ जानेवारी २०२३ : कारी (ता. धारूर, जि. बीड) येथील एका शेतकऱ्याने फेसबुकवरील जाहिरात पाहून खरेदीसाठी बैलजोडी बुक केली होती. त्यानंतर समोरच्या अज्ञात व्यक्तीने या शेतकऱ्याकडून वेगवेगळ्या कामांसाठी ९५ हजार रुपये आपल्या खात्यात टाकायला सांगितले; मात्र अज्ञात व्यक्तीने बैलजोडी न देता इतर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शेतकऱ्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तत्काळ शेतकऱ्याने पोलिस ठाणे गाठले.

आपल्याकडील ऑनलाइन वस्तू लोकांनी खरेदी करावी, यासाठी वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून लोभ दाखवून नागरिकांची फसवणूक केलेली आपण आतापर्यंत पाहिली आहे; मात्र कारी (ता. धारूर, जि. बीड) गावातील ज्ञानेश्वर दगडू फरताडे यांनी फेसबुकवर आलेली जाहिरात पाहून आपल्या शेतात काम करण्यासाठी बैलजोडी बुक केली; मात्र बौलजोडी बुक केल्यानंतर त्यांना वेगवेगळी कारणे देत अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याकडून जवळपास ९५ हजार रुपये मागितले. हा सगळा व्यवहार ऑनलाइन पद्धतीने झाल्याने नेमका समोरील व्यक्ती कोण? हे शेतकऱ्याला माहिती नव्हते.

९५ हजार रुपये दिल्यानंतर बैलजोडीची मागणी शेतकऱ्याने अनेकवेळा अज्ञात व्यक्तीकडे केली; मात्र उडवाउडवीच्या उत्तरानंतर शेतकऱ्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले; मात्र अशा पद्धतीने ऑनलाइन विक्री करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांद्वारे ऑनलाइन खरेदी करणारे लाखो ग्राहक आहेत; मात्र या लाखो ग्राहकांमध्ये चाळीस टक्के लोकांची ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे; मात्र अशा पद्धतीच्या खरेदी-विक्री करणाऱ्या लोकांवर चाप बसविण्यासाठी सायबर क्राईमकडे नागरिकांनी तक्रारी दाखल कराव्यात, असे अवाहन वेळोवेळी करण्यात येते; तसेच अशा पद्धतीच्या फेक ऑनलाइन खरेदी करण्यापासून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा