शेतकरीपुत्र सैन्यदल लेफ्टनंटपदी; सौरभ धातुंडे अवघ्या २३ व्या वर्षी उच्चपदावर विराजमान

वालचंदनगर, १७ डिसेंबर २०२२ : भरणेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सौरभ धातुंडे याची भारतीय सैन्यदलाच्या लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. त्याच्या यशाने भरणेवाडीच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे. सौरभचे प्राथमिक शिक्षण भरणेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले.

यानंंतर त्याने सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन पहिल्याच प्रयत्नात ते ओटीए (ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी) बिहार येथील गया येथे प्रवेश मिळाला. नंतर हैद्राबाद येथे बी.टेक. पूर्ण केले. आता त्याने भारतीय सैन्यदलाच्या लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सौरभने लहानपणापासून जिद्दीने शिक्षण घेतले.

सौरभ याच्या नियुक्तीनंतर माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्याचा यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना श्री. भरणे म्हणाले, की जीवनामध्ये खडतर प्रवास असतानाही किंचितही न डगमगता सौरभ याने यश मिळविले आहे. युवकांनी सौरभचा आदर्श घेऊन वाटचाल करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा