पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चंदन चोरांच्या टोळीला मुद्देमालासह अटक

13

पुणे, २४ ऑगस्ट २०२२: पुणे पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या युनिट तीनने कारवाई करत चंदन चोरांच्या टोळीला दहा किलो चंदनाच्या मुद्देमाला सह अटक केली आहे. या पूर्ण कारवाईमध्ये ९५ किलो चंदनाची कापलेली झाडे व यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे ताब्यात घेण्यात आली आहेत.

पोलिसांनी सापळा लावून ही कारवाई केली. लहू तानाजी जाधव, हनुमंत रमेश जाधव, महादेव तानाजी जाधव, तिघे रा. केडगाव चौफुला चौक, धायगुडे वाडी, ता. दौंड, जि. पुणे, रामदास शहाजी माने रा. मोढवे, खोमणे वस्ती, ता. बारामती, जि. पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुण्यामधील एफटीआयच्या आवारातून काही दिवसांपूर्वी, चोरट्यांनी तीन चंदनाची झाडे तोडून नेऊन चोरी केली होती. त्या अनुषंगाने तपास करत असताना चोरलेल्या चंदनाच्या झाडाचा उपयुक्त भाग हा अशोक तांदळे याला विकण्यात आल्याची माहिती युनिट तीन शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तांदळेच्या घरी जाऊन तपास केला होता.

चौकशीसाठी पोलिसांनी तांदळेच्या घरी जाऊन तपास केला परंतु पोलीस तपासासाठी आले तेव्हा तांदळे घरामध्ये सापडला नाही. तांदळेच्या पत्नीकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा त्याच्या घरातून ८५ किलो चंदनाची लाकडे जप्त करण्यात आली. चंदनाची झाडे कापून नेणाऱ्या चोरांची टोळी सिंहगड रोड परिसरात येणार असल्याची, माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आरोपींना सापळा रचून पकडले.

न्यूज अनकट प्रतिनिधी– अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा