पुणे, १८ जानेवारी २०२३ : जिंतूर येथे ‘जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघा’तर्फे ‘दर्पण दिना’चे औचित्य साधून रविवारी (ता. १५) शहरातील जुनी मुन्सफी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या काव्य मैफिलीत महाराष्ट्रातील ख्यातनाम कवींनी वेगवेगळ्या विषयांवर दर्जेदार कवितांचे सादरीकरण केल्याने काव्यमैफिलीची संध्या चांगलीच रंगली होती. यावेळी उपस्थित जनसमुदायाने तब्बल तीन तास प्रत्येक कवितेला दाद दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मेघना बोर्डीकर होत्या. तर उद्घाटक म्हणून ब्रीजगोपाल तोष्णीवाल उपस्थित होते. प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्राचार्य श्रीधर भोंबे, भाजप तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, डॉ. दुर्गादास कान्हडकर, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, एम. ए. माजीद, अॅड. सुनील बुधवंत, प्रतिष्ठित व्यापारी सत्यनारायण शर्मा, देवेंद्र अण्णा भुरे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मते, प्रा. बाळू बुधवंत, बालाजी सांगळे, हकीम लाला आदींची उपस्थिती होती.
या काव्य मैफिलीत ख्वाडा, बबन, छत्रपती शासन, राजकुमार यांसारख्या मराठी चित्रपटांत गीतलेखन करणारे कवी, संगीतकार, लेखक, कथाकार प्रा. डॉ. विनायक पवार; तसेच ‘मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा’ कवितेचे प्रसिद्ध कवी अनंतराव राऊत आणि साम टीव्ही मराठीच्या वृत्त निवेदिका तथा कवयित्री यामिनी दळवी यांनी ‘आई’, ‘बाप’, ‘मैत्री’, ‘प्रेयसी’, ‘माणूस’, ‘खरे प्रेम’, ‘वृद्ध आईची व्यथा’ आदींवर पहाडी आवाजात दर्जेदार कवितांचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित जनसमुदायाने मनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक कवितेला दाद दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शेख अलीम, रामप्रसाद कंठाळे, शेख वाजीद, सय्यद नसीर, एम एजाज, बालाजी शिंदे, राजू देशमुख, रफिक तांबोळी, गजानन चौधरी, इसाक काजी, शम्मू पटेल, प्रभाकर कुऱ्हे आदींनी परिश्रम घेतले. संघाचे अध्यक्ष शहेजाद खान यांनी प्रास्ताविक केले. विनोद पाचपिल्ले यांनी सूत्रसंचालन केले, तर शेख शकील अहमद यांनी आभार मानले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील