पुणे, १२ नोव्हेंबर २०२२ : पुण्यातील वडकी येथे चप्पलच्या गोदामाला शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. रबरी चप्पल, बूट जळाल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाबरोबर नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने जीवितहानी टळली मात्र, वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील वडकी (ता. हवेली) येथील जिंदाल गोडाऊनला रात्री अकराच्या सुमारास आग लागली.अजय दिनेश जिंदल (रा. हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीचे वृत्त समजताच काळेबोराटेनगर, कोंढवा खुर्द, पीएमपीआरडी-२, बी.टी. कवडे-२ वाघोली आणि कोंढव्यातील अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून सकाळी सहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि बंदोबस्त ठेवला. भीषणआग लागल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.दरम्यान, गोडावूनच्या शटरचा भाग अचानक कोसळला, त्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानाला किरकोळ दुखापत झाली. पुढील तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर