मोठा अनर्थ टळला ! रिक्षाला वाचविण्याच्या नादात बस दुभाजकाला धडकली

पिंपरी, २७ सप्टेंबर २०२३ : शहरात अचानक पाऊस सुरू झाल्याने, पावसापासून आडोशासाठी चिंचवड येथील सेंट मदर तेरेसा पुलाखाली काही नागरिक थांबले होते. त्याचवेळी बोरीवलीवरुन पुण्याकडे जाणारी एसटी या ठिकाणाहून जाताना रिक्षा अचानक आडवी आली, मात्र एसटीचालकांने प्रसंगावधान राखत गाडी बाजूस घेतली खरी; मात्र चालकांचा अंदाज चुकल्याने बस थेट रस्ता दुभाजकात घुसली. या घटनेत रस्त्यावर थांबलेले नागरिक, रिक्षाचालक यांचा जीव वाचला असून, एसटीतील प्रवासी सुखरूप आहेत.

गणेशोत्सवानिमित्त परिवहन महामंडळाने नागरिकांसाठी ज्यादा गाड्यांची सोय केली. पाचोरा डेपोचे चालक तानाजी सरवदे हे बोरीवली ते पुणे या मार्गात सेवा बजावत होते. चिंचवड येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गांवरुन जाताना सेंट मदर तेरेसा उड्डाण पुलाखाली आल्यानंतर एका रिक्षाचालकांने अरुंद जागेतून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अपघात होऊ नये, तसेच रिक्षा चालकांचेही नुकसान होऊ नये, म्हणून बसचालक सरवदे यांनी बस रस्ता दुभाजकाच्या बाजूस वळवली. याच दरम्यान बस दुभाजकावर आदळून अपघात झाला. यावेळी बसमध्ये ३२ प्रवासी होते.

प्रसंगावधान राखून चालकाने बसवर नियंत्रण ठेवले. यामध्ये बसचे नुकसान झाले. मात्र सर्व प्रवासी, बसचालक आणि वाहक सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत केली. बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढील प्रवासासाठी पाठवून देण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा