शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात पार पडली बैठक, कंगना विषयी झाली चर्चा

मुंबई, १० सप्टेंबर २०२०: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अभिनेत्री कंगना राणौत आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही भेट घेतली गेली. या दोन्ही हाय टेन्शनच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. यामध्ये कंगना राणौतबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर बुधवारी मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. यानंतर शरद पवार यांनी या प्रकरणी पहिल्यांदा भाष्य केलं होतं. मुंबईमध्ये कित्येक अनधिकृत बांधकामे आहेत. आता अधिकाऱ्यांनी हा निर्णय का घेतला हे पाहावं लागेल, असं पवारांनी म्हंटलं होतं. तसेच प्रत्येकाला माहिती आहे की, मुंबई पोलीस सुरक्षेसाठी काम करते. यामुळे कंगना सारख्या लोकांना प्रसिद्धी देता कामा नये. “कंगनाचं कार्यालय अधिकृत की अनधिकृत माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण मुंबईत बेकायदेशीर बांधकाम काही नवीन गोष्ट नाही. सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता केलेली कारवाई पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची संधी आपण देत आहोत. पण शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियमावली आहे, त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं असेल,” असं ते म्हणाले होते.

या प्रकरणावारील माध्यमं देत असलेल्या प्रसिद्धीवरही मला आक्षेप आहे. माध्यमं ही गोष्ट मोठी करत आहेत. आपल्याला अशा गोष्टी टाळायला हव्यात, असं ही पवारांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. तसेच बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी जी कारवाईची वेळ निवडली आहे ती देखील लोकांमध्ये चुकीचा संदेश देते, असं पवारांनी म्हटलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा