मुंबईतील वांद्रे मध्ये कोसळली बहुमजली इमारत, सात जण बचावले

2

मुंबई, 27 जानेवारी 2022: मुंबईतील वांद्रे येथे बुधवारी एक बहुमजली इमारत कोसळून तीन महिलांसह सात जणांना वाचवण्यात यश आलंय. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे येथील कोसळलेल्या इमारतीतून सात जखमींना बाहेर काढण्यात आलं असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलंय. जखमींची प्रकृती स्थिर आहे.

पश्चिम उपनगरातील बेहराम नगर येथे दुपारी 3.30 च्या सुमारास ग्राउंड प्लस चार मजली इमारत कोसळली. अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केलं. ढिगाऱ्याखालून तीन महिलांसह एकूण सहा जणांना बाहेर काढण्यात आलं. यातील दोन महिलांसह चौघांना व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एका महिलेसह अन्य दोघांना भाभा रुग्णालयात पाठवण्यात आलं.

सर्वांची प्रकृती स्थिर असून ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. घटनास्थळी अर्धा डझन रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि एक रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आली.

याआधी मुंबईतील तारदेव परिसरातील कमला बिल्डिंग या बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला होता तर 23 जण जखमी झाले होते. शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. शनिवारी सकाळी 7.30 वाजता मध्य मुंबईतील तारदेव परिसरातील गोवालिया टँकजवळील भाटिया हॉस्पिटलसमोरील 20 मजली कमला बिल्डिंगच्या 15व्या आणि 16व्या मजल्यावर धुराचे लोट उठताना दिसले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वेळातच आग 19व्या मजल्यावर पोहोचली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र आग आणि धुराच्या लोळात पडलेल्या सुमारे 30 जणांना जवळच्या रुग्णालयात हलवावं लागलं. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. या इमारतीत अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे मुंबईचे अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी पत्रकारांना सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा