‘जनता कर्फ्यू’ कोरोनाच्या विरोधात देशभरात लढाई सुरु

नवी दिल्ली: करोना विषाणूचे देशावर ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज सकाळी ७ ते रात्री ९  वाजेपर्यंत भारताच्या तमाम जनतेला  ‘जनता कर्फ्यू’ म्हणजेच संचारबंदी पाळून देश कोरोना विषाणूमुक्त होण्यासाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान द्यायचं आहे.  जगभरातील १८६ देशांमध्य कोरोना व्हायरस पोहोचल्यानंतर सगळ्याच देशांच्या चिंता वाढल्या आहेत. याचा परिणाम आता भारतावरही पाहायला मिळत आहे. देशातील परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे.

देशाच्या नागरिकांनी प्रशासन यंत्रणांना या संपूर्ण दिवसभरात सहकार्य करणे अभिप्रेत आहे. मोदींबरोबरच देशातील अनेक बडे लोक,  चित्रपट, मालिका आणि माध्यम कलाकारांनी देखील सोशल मीडियाद्वारे पुढाकार घेऊन जनता कर्फ्यू पाळण्यात सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, नोएडा, लखनऊ, बंगळुरु सारख्या मोठ्या शहरात लॉक डाऊन सारखी स्थिती आहे. अनेक ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. बस सेवा, टॅक्सी सेवा आणि रेल्वे देखील बंद राहणार आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

राज्यात शनिवारपर्यंत करोनाचे एकूण १२ नवीन रुग्ण आढळले असून त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ६४ झाली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत आहेत. यामुळे इथल्या प्रत्येक जनतेनं कोरोनाच्या लढाईत आपलं योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही शनिवारी २८३ वर पोहोचली आहे. आजच्या ‘जनता संचारबंदी’च्या पार्श्वभूमीवर मेट्रो आणि मोनो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.

कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण प्रवास करू नये. आहात तिथेच पुढील काही दिवस राहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर हिंदीतून लिहिलेल्या ट्विटमध्ये त्यांनी नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे कारण नसेल तर घरातून बाहेर पडू नये, असेही आवाहन केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा