भारतीय संघासमोर एक नवीन आव्हान, मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का

नवी दिल्ली, ३ डिसेंबर २०२२ : विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला होता; परंतु बांगलादेश दौऱ्यात पुन्हा एकदा जुनिअर, सीनिअर खेळाडूंचा खेळ मैदानात पाहायला मिळणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला खूप मोठा धक्का बसला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला दुखापत झाल्यामुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. ‘बीसीसीआय’ने याबद्दल अधिकृत माहिती दिलेली आहे. शमीच्या हाताला दुखापत झाल्याने तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली उपचार घेतोय.

शमीच्या हाताला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळे एकदिवसीय मालिकेत तो खेळणार नाही; परंतु कसोटी मालिकेपर्यंत त्याची दुखापत बरी होईल, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. ‘बीसीसीआय’मधील एका सूत्राने सांगितल्याप्रमाणे, ऑस्ट्रेलियात झालेल्या टी २० विश्वचषकानंतर सरावादरम्यान मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली आहे. आशिया चषकापासून टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे टीम इंडियातील गोलंदाजांवर जोरदार टीका होत आहे. त्यामुळे बांगलादेश दौऱ्यात भारतीय संघाचे खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

या सामन्यांसाठी भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, यष्टिरक्षक ऋषभ पंत, यष्टिरक्षक ईशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक शहर, कुलदीप सेन खेळणार आहेत. तर या परिस्थितीत ‘बीसीसीआय:ने शमीच्या बदलाची घोषणा करीत शमीऐवजी उमरान मलिकला संघात सामील केले आहे.

४ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता पहिला एकदिवसीय सामना असेल. ७ डिसेंबर आणि १० डिसेंबरला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना ढाका येथे पार पडेल. त्याचप्रमाणे १४ ते १८ डिसेंबर पहिली कसोटी, तर २२ ते २६ डिसेंबर रोजी दुसरी कसोटी चितगाव आणि ढाका येथे खेळली जाईल.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा