मुंबई, दि. १८ मे २०२०: डॉक्टर, वैद्यकीय व्यवसायिक , आरोग्य कर्मचारी आणि आघाडीचे योद्धे कोविड-१९ विरोधातल्या लढ्यात अविश्रांत योगदान देत आहेत. विविध कोरोना रुग्ण आणि कोरोना विषाणूने बाधितांशी या व्यवसायिकांचा नित्याचा संबंध येतो. पीपीई म्हणजेच वैयक्तिक संरक्षण साधनांचा वापर केला नाही तर त्यांना स्वतःला या विषाणूची बाधा होण्याचा धोका असतो.
कोविड-१९ पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई परिधान करणे अतिशय महत्वाचे ठरते. पीपीई मुळे विषाणूशी संपर्क होण्याचा धोका कमी होतो. मात्र अनेक थर असलेला पीपीई सूट किंवा पोशाख परिधान करून कोविड-१९ च्या रुग्णावर उपचार करणे आणि उष्ण आणि दमट हवामानात ६, ८ किंवा १२ तास काम करताना या व्यावसायिकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना करणेही अशक्य आहे.
एक डॉक्टर, इतर डॉक्टरांचा त्रास समजून घेऊ शकतो, या डॉक्टरांनी यावर व्यवहार्य आणि प्रभावी उपाय शोधला. भारतीय कल्पक वस्त्र साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या नौदलाच्या नावरक्षक पीपीई मुळे वैद्यकीय आणि आरोग्य व्यवसायिकात नवी आशा निर्माण झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याच्या दृष्टीकोनातून हा पीपीई सूट तयार करण्यात आला आहे.
पीपीई तयार करताना प्रत्येकजण पाणी, रक्त, रुग्णाच्या शरीरातले द्राव यांना प्रतिकार करण्याची क्षमता असणाऱ्या साहित्याचा विचार करतो मात्र पीपीई वापरणाऱ्या व्यक्तीसाठी तो सुखकर किंवा त्याला हवेशीर कसा ठरेल यावर फारच कमी लक्ष पुरवले जाते.हा पीपीई सूट एका डॉक्टरने, डॉक्टरांचा हा त्रास विचारात घेऊन तयार केला असल्याचे शल्यविशारद लेफ्टनंट कमांडर अर्णब घोष यांनी सांगितले. मुंबईतल्या नौदल वैद्यकीय संस्थेच्या नाविन्यता विभागाचे नौदल वैद्यकीय तज्ञ असलेले घोष हे या कमी खर्चाच्या पीपीईच्या संकल्पनेमागचे खरे शिल्पकार आहेत. नावरक्षक म्हणजे अद्भुत संरक्षक, याची दोन वैशिष्ट्ये आहेत, जास्तीत जास्त संरक्षण आणि जास्तीत जास्त हवेशीर.
एक डॉक्टर म्हणून मी सांगू इच्छितो की, भारतीय बाजारात उपलब्ध असलेले बरेच पीपीई हवेशीर या पैलूकडे दुर्लक्ष करणारे असल्याचे घोष म्हणाले. कमी आणि दुय्यम दर्जाच्या पीपीईचा दीर्घकाळ वापर केल्याने आरोग्य कर्मचारी लगेच थकतो असेही त्यांनी सांगितले. हवेशीर म्हणजे बाष्प जाऊ देण्याची आणि पाण्याला आत शिरण्यासाठी प्रतिबंध करण्याची त्या वस्त्राची क्षमता. वस्त्राची सुखकरता ही शरीरातले बाष्प बाहेर जाऊ देऊन शरीरावर द्रव जमा होऊ देण्यासाठी प्रतिबंध करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते.
कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व मागणीमुळे, रुग्णालयांसाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि इतर संस्था पीपीई खरेदी करून त्याचा पुरवठाही करत आहेत. पुरवण्यात येत असलेल्या पीपीईचा दर्जा राखणे ही एक काळजीची बाब आहे. कमी दर्जाच्या पीपीई मुळे आरोग्य कर्मचाऱ्याचे आणखी नुकसान होऊ शकते कारण या पीपीई मुळे त्याला विषाणूपासून संरक्षण असल्याचा खोटा आभास होऊ शकतो. नावरक्षक, न विणलेले अत्याधुनिक दर्जाचे कापड वापरून, विशिष्ट जीएसएम आणि विशिष्ट तंत्राने शिवलेले आहेत. यावस्त्राचे वैशिष्ट म्हणजे मजबूत एकसमान बांधणी जी, द्रव, रक्त, शरीरातले द्राव यांना उत्तम प्रतिरोध करते.
भारतीय नौदलाने विकसित केलेल्या या कल्पक आणि माफक खर्चाच्या पीपीई चे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या आयपीएफसीने पेटंट अर्थात स्वामित्व हक्क घेण्यासाठी आधीच अर्ज दाखल केला आहे. हा पीपीई तयार करण्यासाठी सात दिवस लागले. यासाठी कापडाच्या विस्तृत प्रकारांवर व्यापक संशोधन आणि ग्लोव तसेच यासारख्या इतर वैद्यकीय उपयोगाच्या साधनांचा अभ्यास करावा लागला. लॉक डाऊनमुळे कच्चा माल मिळवणेही कठीण होते. संशोधनानंतर मला हे नवे तंत्रज्ञान सापडले असे घोष म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी