बीड, दि.१७ मे २०२० : केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील उपकेंद्रातील एका नर्सने युनानी दवाखान्यातील एका कंपाऊंडरला कार्यालयातच वैद्यकीय अधिकार्यासमोर चप्पलेने मारल्याची घटना समोर आली आहे. मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला?याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा प्रकार समजताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी शनिवारी (दि.१६) दुपारी जिवाचीवाडी येथे तातडीने भेट देऊन या घटनेला दुजोरा दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे युनानी दवाखाना आहे. या दवाखान्यात डॉक्टराची जागा रिक्त असल्यामुळे हा दवाखाना केवळ शिपाई व एका कंपाऊडरवरच चालत आहे. मात्र हा दवाखाना सतत बंदच असलयाच्या तक्रारी ग्रामस्थानी यापूर्वी अनेक वेळा वरिष्ठांकडे केल्या होत्या. तरीही या कर्मचार्यांवर कुठलीच कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थ या कर्मचार्यांना कंटाळले आहेत. या कर्मचार्यांची येथून बदली करण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे.
जिवाचीवाडी येथे आरोग्य उपकेंद्र असून युनानी दवाखाना व आरोग्य उपकेंद्राची इमारत समोरासमोर असून आरोग्य केंद्रात दोन सिस्टर कार्यरत आहेत. विडा आरोग्य केंद्राअंतर्गत हे उपकेंद्र चालत असून विडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.शिला कांबळे यांच्या अधिपत्याखाली हे उपकेंद्र सुरु आहे. या केंद्रात कार्यरत असलेल्या एका नर्सने शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास या कंपाऊंडरला चपलेने बदडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय वैद्यकीय अधिकारी डॉ.शिला कांबळे यांंच्या उपस्थितीत हा प्रकार घडला आहे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी सांगितले की, टेबल घेण्यादेण्यावरून वाद झाला आहे.याबाबत आपल्याकडे अधिकृत तक्रार आली नसल्याचेही तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: