मुंबईत बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच येणार सिंहांची जोडी

अहमदाबाद, २७ सप्टेंबर २०२२ : प्राणी प्रेमींसाठी खुशखबर आहे. लवकरच गुजरातच्या जुनागढमधील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर आणि मादी सिंहांची जोडी मुंबईत बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच येणार आहे. या बदल्यत जुनागड उद्यानात बोरिवली उद्यानातील नर आणि मादी वाघ पाठविण्यात येणार आसल्याचे राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा आणि मुनगंटीवार यांच्यात सोमवारी अहमदाबादमध्ये चर्चा झाली.

या संबंधीच्या प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये आणि जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात याविषयी चर्चा झाली होती. याबाबत चालूवर्षी एप्रिलमध्ये अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ. क्लेमन्ट बेन आणि बोरिवली वन उद्यानाचे संचालक जी मल्लिकर्जुन यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक श्री सुनील लिमये यांनी निर्देशित केल्याप्रमाणे गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या बरोबर चर्चा करून कार्यवाही सुरू केली होती.

आता त्यावर महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि गुजरात चे राज्यमंत्री श्री विश्वकर्मा यांनी सोमवारी २६ सप्टेंबर ला सविस्तर चर्चा केली. त्यानुसार केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी दोन्ही राज्यांकडून एकत्रित प्रयत्न करायचे ठरवण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा