घाटकोपरमध्ये ४ मजली इमारतीचा भाग कोसळला, २ जण अडकले तर ४ जणांची सुटका

मुंबई २५ जून २०२३: मुंबईत मुसळधार पावसामुळे घाटकोपर येथे, एका ४ मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. घाटकोपर पूर्वेकडील राजावाडी कॉलनी येथे, ग्राउंड प्लस तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. यात २ लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. सध्या या इमारतीत अजुन काही रहिवासी अडकले आहेत का, याची पाहणी होत आहे.

एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून ते तात्काळ मदतकार्यात गुंतले आहेत. महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, ४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून २ लोक अजूनही आत अडकले आहेत. बचाव कार्य अजूनही सुरू आहे.

विशेष म्हणजे अशाच एका दुसऱ्या घटनेत, शनिवारी रात्री उशिरा ठाण्याजवळील घोडबंदर रोडवर असलेल्या एका रेस्टॉरंटचे छत कोसळून तीन जण जखमी झाले. या घटनेत दोन महिला आणि एक पुरुष जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलय.

कालपासून मुंबई शहरातील काही भागात जोरदार पाऊस सुरू झालाय. आयएमडी ने मुंबई शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी आयएमडी ने रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा