बारामती तालुक्यातील मेखळी गावच्या हद्दीत आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

बारामती, १८ डिसेंबर २०२०: बारामती तालुक्यातील मेखळी हद्दीतील बरकडवाडी येथे स्मशान भूमीमध्ये एका तीस ते पस्तीस वर्ष वय असलेल्या पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश ढवाण आपल्या पथकासह घटनास्थळी
पोहचले असून, अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही.

ही घटना गुरुवार दि. १७ रोजी उघडकीस आली. पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता, अद्याप मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे बारामती तालुका पोलिस स्टेशनचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेखळी हद्दीतील बरकडवाडी येथील स्मशानभूमीत एका पुरुषाचा अर्धवट जळालेला मृत्यूदेह असल्याची माहिती पोलिस पाटील सुभाष भोसले यांना मिळाली होती.

माहिती मिळताच भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मृतदेहावर असलेले कपडे जळत असल्याचे दिसून आले. भोसले यांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली असता, पोलिसांनी घटनास्थळी येत बॉडीचा पंचनामा केला. मृत्यूदेहाजवळ सापडलेल्या वस्तू वरून हा मृतदेह ऊसतोड मजुराचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे व मृत्यू डिझेल टाकून जाळण्यात आला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास बारामती तालुका पोलिस करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा